बारामती -बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनारुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोना संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केले. तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सतर्क राहून योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना, म्यूकरमायकोसिस संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
म्यूकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या -
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही, त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेतले असेल तरी नागरिकांनी मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात सोयीसुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. म्यूकरमायकोसिस रुग्णांकडे विशेष लक्ष द्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, सर्व रुग्णालयात ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे, लिक्वीड ऑक्सिजन साठा पुरेशा प्रमाणात करुन ठेवणे, लसीकरणाचे नियोजन योग्य प्रकारे करावे. म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांची योग्य देखभाल होणे आवश्यक आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही पवार यांनी केले.