पुणे - सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची ३५वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ( Pune International Marathon ) शनिवारी (२६ फेब्रुवारी) रात्री १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने रात्रीची मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. पुण्याच्या क्रीडा विश्वात मानबिंदू ठरलेल्या आणि पुण्याला जागतिक क्रीडा नकाशावर नेणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला दरवर्षी उत्साही पुणेकरांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशात पहिल्यांदाच ही रात्रीची आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे.
मॅरेथॉनमध्ये परदेशातील ३० धावपटू व देशातील २ हजार ५०० धावपटू सहभागी होणार -या अभिनव मध्यरात्र मॅरेथॉनमध्ये परदेशातील ३० धावपटू व देशातील २ हजार ५०० धावपटू सहभागी होत आहेत. ४२.१९५ किलोमिटरचा पुरूष व महिला गट, २१ किलोमिटरचा ( Half Marathon ) पुरूष व महिला गट (अर्ध मॅरेथॉन), १० व ५ किलोमिटरचा पुरुष व महिला, ३ किलोमिटरचा व्हील चेअर अशा विभागात ही स्पर्धा होणार आहे. यासाठी सर्व विभागातील पुरुष व महिला विजेत्यांना रोख बक्षीसे, स्मृती चिन्हे प्रशस्तीपत्रे दिले जातील, अशी माहिती यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी दिली.
असा असेल मॅरेथॉनचा मार्ग -३५ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा ( Pune International Marathon ) रात्री १२ वाजून १ मिनिटांनी सारसबागेजवळील भाऊराव सणस क्रीडा मैदान ( Baburao Sanas Sports Ground ) येथून सुरू हाईल. सणस मैदा-बाजीराव रस्ता-शनिपार-अप्पा बळवंत चौक- शनिवार वाडा-नवा पुल-रामसर बेकरी चौकातून परत याच मार्गानि वळून बाजीराव रस्ता-सणस मैदान, सिंहगड रस्ता-दांडेकर चौक- गणेशमळा- संतोष हॉल-गोयल गंगा चौक-लोकमत भवन व तेथून परत सणस मैदान ही पहिली २१ किलोमिटरची फेरी होईल व पुन्हा त्याच मार्गाने २१ किलोमिटरची दुसरी फेरी पूर्ण करून सर्व धावपटू स्पर्धक सणस मैदानात स्पर्धा पूर्ण करतील. पुरुष व महिलांसाठीची अर्ध-मरेथॉन (२१ किलोमिटर) ही त्याच मार्गाने पहिली फेरी पूर्ण करून सणस मैदान येथे संपणार आहे. यानंतर २७ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता या १० किलोमिटर पुरुष व महिला स्पर्धा सणस मैदान येथून निघेल ती महालक्ष्मी चौक (सारस बाग)-दांडेकर चौक-गणेशमळा-संतोष हॉल येथून परत त्याच मार्गे सणस मैदान येथे संपेल. तर व्हिलचेअरची ३ किलोमिटरची शर्यत सकाळी सव्वासहा वाजता सणस मैदान महालक्ष्मी चौक (सारस बाग)-सिंहगड रस्ता-दांडेकर चौकातून परत सणस मैदान येथे संपेल, असेही यावेळी छाजेड म्हणाले.