पिंपरी-चिंचवड- हातामध्ये कोयत्यासारखे हत्यार घेऊन चित्रीकरण करणे पुण्यातील एका गुन्हेगाराच्या चांगलेच अंगलट आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी 'त्या' गुन्हेगारावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मयुर उर्फ यम सरोदे असे पोलिसांनी अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
मयुर सरोदे हा एक गुन्हेगार आहे. त्याच्यावर भादवि 326 चा एक गुन्हा दाखल आहे. स्वतःला भाई आणि गुन्हेगार म्हणून मिरवून घेण्यासाठी मयुरने कोयत्या सोबत आपले व्हिडियो तयार करून ते सोशल मीडियावर पोस्ट केले. त्याने हा प्रकार परिसरात दहशत पसरविण्यासाठी केला असल्याचे म्हटले जात आहे.
मी कोण आहे हे सांगण्याची जगाला वेळ आली, असा डॉयलॉग बोलून मयुर हातात कोयत्यासारखे हत्यार घेतो. या क्षणाचे चित्रीकरण करण्यात आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. दुसऱ्या व्हिडिओत मयुर कोयता हातात घेऊन, आमची सूत्रे येरवडा जेलमधून हलतात, असे म्हणताना पाहायला मिळत आहे.