पुणे - सणांमुळे लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. अशा परिस्थितीत शिक्षक पदवीधर निवडणुकीमुळे व उमेदवारांच्या प्रचार सभांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने शिक्षक पदवीधर निवडणूक पुढे ढकलावी, या मागणीसाठी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी निवेदन दिले आहे. सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा होत आहेत. तसेच गर्दीमुळे कोरोनाच्या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे.
पदवीधर निवडणूक पुढे ढकलावी...वाढत्या कोरोना संक्रमणामुळे मागणी - पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक
राज्य निवडणूक आयोगाने शिक्षक पदवीधर निवडणूक पुढे ढकलावी, या मागणीसाठी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर यांनी निवेदन दिले आहे.

आठ महिन्यांनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यासाठी शिक्षकांच्या चाचण्या करणे बंधनकारक होते. चाचण्या झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल समोर आले आहेत. शिक्षक पदवीधर निवडणुकांच्या प्रचारसभांना शिक्षकांची उपस्थिती, हे यामागील मुख्य कारण असल्याचे कुचेकर म्हणाले.
त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता डिसेंबर महिन्यातील मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिक्षक पदवीधर आमदार निवडणूक प्रचारसभांवरती निर्बंध घालण्यात यावेत, असेही ते म्हणाले. यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, राज्यपाल महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री, पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे.