पुणे- परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश उत्तमराव विटेकर यांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप परभणी येथील एका शिक्षिकेने केला आहे. राजेश विटेकर यांनी नोकरीचे आणि लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे, असा आरोप संबंधित शिक्षिकेने केला आहे. या शिक्षिकेने भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या मदतीने बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत आपली कैफियत मांडली.
बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार -
राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर यांनी आपली फसवणूक केल्याचो कळल्यानंतर सर्व पुराव्यासहित पोलीस स्टेशनला तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वारंवार टाळाटाळ केल्याचा आरोप या पीडितेने केला आहे. तसेच राजेश विटेकर यांच्या आई आणि परभणीच्या विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला विटेकर यांनीदेखील संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप या पीडितेने केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा शिक्षिकेचा आरोप.. खोट्या प्रकरणात अडकवले -
राजेश विटेकर यांनी, आपले अश्लील व्हिडिओ तयार केले असल्याचा आरोप देखील पीडितेने केला आहे. गेल्या वर्षभरापासून आल्यावर अत्याचार करण्यात आला. तक्रार करुनही अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. आपल्याकडे सर्व पुरावे आहेत, पण फक्त तपास सुरू असल्याचे सांगितले जाते. गृहमंत्री आपल्या पक्षाचे आहे, आपण शरद पवार यांच्या निकटवर्तीय आहोत त्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होणार नाही, कोणी काही वाकडं करणार नाही, असे राजेश विटेकर म्हणत असल्याचा दावा पीडितेने केला आहे. त्यामुळे राजेश विटेकर यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करा, यामध्ये त्यांच्या आईही सहभागी आहेत, असे पीडितचे म्हणणे आहे. आपल्या जीविताला धोका असून आपली आई आणि बहीण याना देखील खोट्या प्रकरणात अटक केली होती, असा आरोप पीडितेने केला आहे.
अन्यथा आंदोलन करू -
या पीडितेला सरकारने न्याय द्यावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. जर संबंधितांना तातडीने अटक झाली नाही, तर परभणीत येऊन आंदोलन करू असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. संबंधित पीडितेने आरोप केलेले राजेश विटेकर हे परभणी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला विटेकर यांचे पुत्र आहेत तसेच ते जिह्यातील राष्ट्रवादीचे नेते आहेत, त्यांनी 2019 ची परभणी लोकसभा निवडणूक लढवली होती.