पुणे - अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा घेतल्यानंतर तालिबानी सरकारने अफगाणिस्तानमधून सुक्क्या मेव्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारतात सुक्या मेव्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. पुण्यातही याचा परिणाम पाहायला मिळत असून सुक्या मेव्याच्या किमतीत दीडपट वाढ झाली आहे. शहरात आठ दिवस पुरेल एवढाच साठा उपलब्ध आहे, अशी माहिती पुणे मर्चंड चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओसवाल यांनी दिली आहे.
ड्रायफ्रूटच्या किंमतीत दीडपट वाढ -
दोन वर्षापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अनेकजण सुक्या मेव्याचा वापर करीत आहेत. त्यामुळे सुक्क्या मेव्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, आता अफगाणिस्तानने सुक्या मेव्याची निर्यात बंद केल्याने सुक्क्या मेव्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. बदामाची एक किलोची किंमती 560 होती ती आत्ता 870 रुपये झाली आहे. काजूचे दर हे 680 वरून 1200 रु एवढे झाले आहेत. तर पिस्ता 1050 वरून 1300 आणि अंजीरच्या किंमतीत 100 रु वाढ झाली आहे. किशमिशच्या किंमतीत 30 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे. एकूणच सुक्क्या मेव्याच्या किंमतीत दीडपट एवढी वाढ झाली आहे.