पुणे - एका तडीपार गुंडाने शिवजयंतीच्या दिवशी शहरात प्रवेश करत हातात कोयता घेऊन दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. शिवजंयतीच्या निमित्ताने नाचताना या तडीपार गुडांने हातात कोयता घेत दहशत निर्माण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्याच्या सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे येथील हा प्रकार घडला आहे. रोशन लोखंडे असे या तडीपार गुंडाचे नाव आहे.
पुण्यात हातात कोयता घेऊन तडीपार गुंडाची दहशत - तडीपार रोशन लोखंडे
रोशन लोखंडे हा सराईत गुन्हेगार असून पुणे पोलिसांनी त्याला यापूर्वीच शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी शस्त्र जवळ बाळगणे दरोडा आदी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
अन्य एकाच्या हातात बंदूक-
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोशन लोखंडे हा हातात कोयता घेऊन एका तरुणाच्या खांद्यावर उभे राहून नाचताना दिसत आहे. तर याच ग्रुपमध्ये नाचणाऱ्या अन्य एका तरुणाच्या हातातही बंदूक दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ कुणीतरी सोशल मीडियावर टाकल्याने हा प्रकार उघडकीस आला. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये तडीपार गुंड पुन्हा शहरात आल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड रस्ता पोलिसांकडून मात्र अद्याप या प्रकरणी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.
रोशन लोखंडे हा सराईत गुन्हेगार असून पुणे पोलिसांनी त्याला यापूर्वीच शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी शस्त्र जवळ बाळगणे दरोडा आदी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तडीपार असलेले गुंड शहरात येऊन अशाप्रकारे गुन्हेगारी कृत्य करीत असल्याचे माहीत असूनही पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.