पुणे -हिजाब प्रकरणानंतर ( Hijab controversy ) राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत असून या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule Statement On Hijab ) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. कोण काय कपडे घालणार, हे कोण ठरवणार आहे. आम्ही पुरुषांना विचारतो, का तुम्ही टोपी का घातली, जॅकेट का घातला. मग तुम्ही आम्हाला का विचारता? काय घालायचं हा अधिकार आमचा आहे, आम्ही ठरवू काय घालायचं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांच्या पाणीप्रश्न तसेच टॅक्स प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.
सोमैयांचे आरोप रॅपिड रिडींगसारखे -
भाजपाचे नेते किरीट सोमैया हे सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर आरोप करत असतात. त्यावर सुळे यांना विचारले असता, ते म्हणाले की सोमैया वारंवार आरोप करत आहे. ते रोज नवीन एक आरोप करत असतात. ते समजत नाही, तोवर ते दुसरा आरोप करतात. त्याचे आरोप हे रॅपिड रिडींग सारखे झालेले आहे, असा खोचक टोलाही त्यांनी सोमैयांना लगावला. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या 10 मार्च पर्यंत राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल, या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली, अजून 10 मार्च यायला खूप वेळ आहे, असं त्या म्हणाल्या.