बारामती - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून विषाणूंचा वेगाने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही सूचनावजा आवाहन करणारे पत्र लिहिले आहे. या पत्राचा संदर्भ घेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन केले आहे.
राज्यभर रक्तदान शिबिरे घ्या, सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रवादी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आवाहन - रक्तदान शिबिरा बद्दल बातमी
सध्या राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. हे लक्षात घेता राज्यभर रक्तदान शिबिरे घ्या, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केले आहे.

राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. हे लक्षात घेता राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपले आवाहन आहे, की कृपया हा तुटवडा दूर करण्यासाठी राज्यात जेथे शक्य असेल, त्या त्या प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिरे घ्यावीत. आपण एकमेकांना सहकार्य करून परस्पर सहकार्य व सामंजस्याने एक समाज म्हणून या संकटाचा सामना करू. हे संकट दूर होऊन पुन्हा एकदा आपण नव्या क्षितिजाकडे झेपावू असा मला ठाम विश्वास आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटल्यानुसार, सर्वांनी प्रशासकीय यंत्रणांनी वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करावे. याशिवाय मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यासोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या तत्वाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गर्दी होणारे कोणतेही कार्यक्रम आपण सर्वांनीच कसोशीने टाळणे आवश्यक आहे. राज्यातील प्रशासन, आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, परिचारिका व सपोर्टिंग स्टाफ आणि पोलीस यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अविश्रांत मेहनत घेत आहे. आपली सर्वांची साथ मिळाली तर कोरोनाचे हे संकट परतवून लावण्यात सर्वजण यशस्वी होऊ, असेही त्यांनी आवाहन केले आहे.