पुणे - कोरोनाचा लढाईत डॉक्टर-नर्स यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. देशात महामारीला सुरुवात झाल्यापासून वैद्यकीय विभागातील सर्वांनीच शर्थ केली. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यातील महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये आढळला. याच नायडू रुग्णालयातील कोरोनाच्या सुरवातीपासून ते आतापर्यंत तब्बल अडीच हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केलेल्या कोरोना मर्दिनीची 'ईटीव्ही भारत' काहाणी वाचकांसाठी आणत आहोत. डॉ.नम्रता चंदनशिव या आजही नायडू रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. त्यांनाही कोरानाची लागण झाली होती. मात्र, त्यातून सावरून त्या पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्या.
तब्बल अडीच हजार कोरोना रुग्णांवर उपचार करणारी 'कोरोना मर्दिनी' पुण्यातील महत्त्वाच्या नायडू सांसर्गिक रुग्णालयात मार्चमध्ये डॉ.नम्रता चंदनशिव रुजू झाल्या. मार्चमध्ये राज्यासह पुण्यातही कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली आणि नायडू रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू झाले. त्यावेळी मोजक्याच असलेल्या डॉक्टरांवर मोठी जबाबदारी आली. त्यातल्याच डॉ.नम्रता चंदनशिव यांनी आतापर्यंत अडीच हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत.
डॉ.नम्रता चंदनशिव यांनी आतापर्यंत अडीच हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. कोरोनाचा सुरुवातीचा काळ खूप आव्हानात्मक होता. कोणालाच काही कळत नव्हतं. तरीही आम्ही न खचता न डगमगता या आव्हानाला तोंड दिलंय. कोरोना रुग्णांवर उपचार करत होतो. आवाहनं अनेक होती. पण पर्याय नव्हता. रुग्णांची सेवा करण्यासाठी आम्ही सर्वजण एका टीम सारखं काम करत होतो. मनात भीती होती. पण न खचता रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करत होत असल्याची माहिती डॉ.नम्रता चंदनशिव यांनी दिली.एकीकडे कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना अनेक डॉक्टर, नर्सेस कोरोनाबाधित होत आहेत. जुलै महिन्यात नायडू रुग्णालयात पहिल्या डॉक्टराला कोरोनाने गाठलं. त्या होत्या डॉ.नम्रता चंदनशिव! त्यांचे पती देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले. कोरोनामुक्त झाल्यानंतर लगेच त्यांनी पुन्हा नव्या जोशाने रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. डॉक्टर नम्रता चंदनशिव कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कुटुंबाची साथ मोलाची ठरली.
पंतप्रधानांच्या 'त्या' फोनमुळे कामाची ऊर्जा मिळालीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात नायडू रुग्णालयातील नर्सशी संवाद साधून विचारपूस केली होती. त्या एका कॉलने नायडू रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि नर्स यांच्या कामाला एक ऊर्जा मिळाली आणि आणखी जोमाने रुग्णालायतील सर्व स्टाफने काम करायला सुरुवात केली, असं त्या म्हणाल्या. पुरुषांपेक्षा महिलांना आंतरिक शक्ती जास्त असते. त्यामुळेच आज मी अनेक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहे. कोरोनाच्या या संकटकाळातही स्त्री शक्तीची सक्षमता चंदनशिव यांच्या कार्यातून दिसते.