पुणे -सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवला पुणे ग्राणीण पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. रविवारी रात्री उशीरा त्याला पुण्यातील जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी जाधव टोळीतील अन्य एका गुन्हेगारालाही ताब्यात घेतले आहे. मात्र कोण आहे सतोष जाधव, तो गुन्हेगारीकडे कसा वळला याचा घेतलेला हा आढावा.
कोण आहे संतोष जाधव -संतोष जाधव हा मूळचा आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पोखरी गावचा आहे. मात्र त्याचे वास्तव्य मंचरमध्ये होते. आई वडील बहीण असे चौघे जण मंचरमध्ये राहत होते. मंचर पोलीस स्टेशन हद्दीत राण्या उर्फ ओमकार बानखेले याचा 1 ऑगस्ट 2021 रोजी खून करण्यात आला होता. या खुनात सहभागी असल्याचा गुन्हा संतोषवर दाखल आहे. मंचर पोलीस ठाण्यात एक खंडणीचा, चोरीचा गुन्हा देखील दाखल त्याच्यावर दाखल आहे. राण्या बाणखेले खुनाच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला होता. या प्रकरणात त्याला तडीपार करण्यात आले होते. तेव्हापासुन तो राजस्थान, पंजाब हरियाणा या भागात वास्तव्यास होता. त्या परिसरात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. राण्या खून प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी संतोषला अटक केली आहे.
ग्रामीण तरुणांवर लॉरेनस् बिश्नोई गँगचा प्रभाव -पुण्याच्या ग्रामीण भागात तरुणांवर लॉरेनस बिश्नोई गँगचा प्रभाव असल्याचे समोर येत आहे. या परिसरातील तरुण या गँगच्या मोहोरक्याप्रमाणे आपली पर्सनॅलिटी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. कपाळावर लाल कुंकू, दाढी साधारण वाढलेली, अंगावर काळे कपडे, गळ्यात काळी शाल, रुद्राक्षाची माळ, बंदुकी बरोबरचे फोटो असा पेहराव साधारण या गँगचा असतो. संतोष जाधव सुध्दा त्या गँगशी निगडित आहे. याशिवाय त्याने मंचर परिसरात गँग देखील तयार करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे.
सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील आरोपी -पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडात पुणे कनेक्शन असल्याचे पुढे आल्यानंतर राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती. पुण्यातील सौरव महाकाल आणि संतोष जाधव या दोन कुख्यात आरोपीचा सिद्धूच्या हत्याकांडात सहभाग असल्याने पंजाब पोलीस त्यांच्या मागावर आहे. दुसरीकडे पुण्यात घडलेल्या हत्याकांडाच्या घटनेतही पुणे ग्राणीण पोलीस सौरव महाकाल आणि संतोष जाधव या दोघांच्या मागावर होते. मात्र हे दोघेही मिळून आले नव्हते. सिद्धू मुसेवाला हत्याकांडात या दोघांची नावे आल्याने हे पंजाबमध्ये सक्रिय असल्याचे उघड झाले. त्यामुळे पुणे पोलीस खडबडून जागे झाले. पुणे पोलिसांनी अगोदर सौरव महाकालच्या मुसक्या आवळल्यानंतर रात्री संतोष जाधवलाही गुजरातमधून अटक केली.