महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

काकांसाठी सोडली खासदारकी मग थोपटले दंड; भल्या पहाटे खळबळ उडवून देणारा 'दमदार' नेता 'अजित पवार' - Ajit Pawar Birthday News

अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील एक प्रसिद्ध नाव आहे. राज्याच्या राजकारणात त्यांचा कायमच दरारा असतो. त्यांच्या कार्यशैलीला भलेभले अधिकारी देखील घाबरतात. धरणातील पाण्याचा विषय असो, की पहाटेच्या शपथेचा, अजित पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असतात. ते काहीही असो, अजित पवारांवर जीव ओवाळून टाकणारी राज्यात कार्यकर्त्यांची एक मोठी फळी आहे. ती फळी कायम अजित पवार यांच्या पाठिशी असते.

Ajit Pawar
निवडून आल्यानंतर जल्लोष करताना उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Jul 21, 2021, 1:16 PM IST

Updated : Jul 22, 2021, 7:50 AM IST

पुणे - राजकारणात दमदार नेता म्हणून अजित पवार यांचा दरारा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भल्या पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन त्यांनी महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. मात्र त्यानंतर 80 तासातच हे सरकार कोसळले. गटनेते म्हणून आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार असल्याचे पत्र अजित पवार यांनी राज्यपालाकडे सोपवले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार माघारी परतले आणि भल्या पहाटे देशभर खळबळ उडवून देणारे नेते अजित पवार हे एकाकी पडले. मात्र महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर पुन्हा त्यांनी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आपल्या दमदार कार्यशैलीने विरोधकांसह अधिकाऱ्यांना घाम फोडणाऱ्या अजित पवार यांचा 22 जुलै हा वाढदिवस. त्यानिमित्त ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी दीपक पाडकर यांनी त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.

काका-पुतण्याची राजकारणातील 'सुपरहिट जोडी'

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २२ जुलै हा वाढदिवस आहे. अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील एक प्रसिद्ध नाव. राज्याच्या राजकारणात त्यांचा दरारा कायमच असतो. त्यांच्या कार्यशैलीला भलेभले अधिकारी देखील घाबरतात. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे पुतणे आहेत. राज्याच्या राजकारणात काका-पुतण्याची ही जोडी खूप प्रसिद्ध आहे. २०१९ मधील निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. यातच अजित पवार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडली. उपमुख्यमंत्री पद असण्यासोबतच अजित पवार हे अर्थमंत्री देखील आहेत.

अजित पवारांचा राजकीय प्रवास....

जेव्हा अजित पवार शिक्षण घेत होते, तेव्हा शरद पवार यांच्याकडे राजकारणातील उगवता तारा म्हणून पाहिले जात होते. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी अजित पवार मुंबईला गेले. १९८२ मध्ये अजित पवार यांनी खऱ्या अर्थाने राजकारणात एंट्री घेतली. सहकारी साखर कारखान्याच्या मंडळात ते निवडून आले. त्यानंतर पुणे जिल्हा को-ऑप बँकेच्या चेअरमनपदी ते तब्बल १६ वर्षे होते.

'काका'साठी सोडली खासदारकी. . .

अजित पवार बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते. मात्र त्यांनी ही जागा आपले काका शरद पवार यांच्यासाठी सोडली होती. काका शरद पवार यांच्यासाठी लोकसभेची जागा सोडल्यानंतर अजित पवार यांनी बारामती मतदार संघातून विधानसभेवर आमदारकी मिळवली. १९९५, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये अजित पवार आमदार म्हणून या मतदार संघातून निवडून आले. सुधाकरराव नाईक यांच्या सरकारमध्ये ते शेती आणि उर्जामंत्रीही होते. त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते. त्यानंतर दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे यांच्या सरकारमध्येही अजित पवार यांनी विविध मंत्रीपदे भूषवले. २००४ मध्ये ते पुण्याचे पालकमंत्री होते. आताही ते पुण्याचे पालकमंत्री आहेत.

अजित पवारांची राजकीय खेळी. . .

अजित दादांनी २०१९ मध्ये संपूर्ण राजकारण ढवळून टाकले. ही निवडणूक सर्वार्थाने आजवरची चर्चेतील निवडणूक ठरली आहे. निकालानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेली महाविकास आघाडी आणि ऐनवेळी भाजपला पाठिंबा देणारे अजित पवार.... यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण आजवरचे राजकारण ढवळून निघाले होते. त्यांनी भल्या पहाटे उरकलेला शपथविधी देखील बराच गाजला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पण तीन दिवसांच्या आतच अजित पवारांचं हे बंड शमवण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आल्याने फडणवीस यांचे सरकार अवघ्या ८० तासात कोसळले होते. त्यानंतर यथासांग शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. ज्यामध्ये अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. 80 तासात पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार हे राष्ट्रवादीचे एकमेव नेते आहेत.

Last Updated : Jul 22, 2021, 7:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details