पुणे - पुण्यातील मायलेकाच्या खून प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या खून प्रकरणातील संशयित असलेला पती आबिद शेख सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आबिद शेख याच्यावर संशयित म्हणून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सात वेगवेगळी पथके स्थापन केली आहेत. आयान आबिद शेख (वय 7) आणि आलिया आबिद शेख (वय 35) अशी खून झालेल्या माय-लेकाची नावे आहेत. याप्रकरणी सासवड आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात संशयित आबिद शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा - दोन वेगवेगळ्या ठिकाणी आढळले मृतदेह -
मंगळवारी (15 जून) सासवड परिसरातील खळद गावाजवळ आलिया शेख तर पुण्यातील नवीन कात्रज बोगद्याजवळ आयान शेख याचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता त्यांना सातारा रस्त्यावरील एका दुकानासमोर ब्रिझा कार सापडली होती. बेपत्ता असलेल्या आबिद शेख याने 11 जून रोजी ही कार भाड्याने घेतली होती. ही कार घेऊन तो आलिया आणि आयान यांच्यासह पिकनिकला गेला होता. सोमवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तो सातारा रस्त्यावरील एका दुकानासमोर गाडी पार्क करून पायी चालत निघून गेला आहे.
दरम्यान, सातारा रस्त्यावर सापडलेल्या कारच्या दरवाज्यावर रक्ताचे सडे आहेत. कारमध्ये रक्ताळलेल्या अवस्थेत लहान मुलांच्या सँडल सापडल्या आहेत. याशिवाय खाण्याच्या वस्तू, फळे विखुरलेली आहेत. फॉरेन्सिक टीमने आज सकाळीच या गाडीतून तपासासाठी काही रक्ताचे नमुने हस्तगत केले आहेत. पुणे पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
- शेख कुटुंबीय मूळचे मध्यप्रदेशातील -
शेख कुटुंबीय मूळचे मध्यप्रदेशातील भोपाळ येथील आहेत. पुण्याच्या धानोरी परिसरात ते राहत होते. आबिद शेख हा एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. सोमवारी पहाटे पुणे - सातारा रस्त्यावर गाडी पार्क केल्यानंतर तो स्वारगेटच्या दिशेने पायी चालत जाताना दिसत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा शोध लागल्यानंतर या संपुर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
सातारा रस्त्यावर सापडलेली कार - खुनापूर्वी शेख कुटुंब दिवसभर फिरले -
तिघेजण धानोरी येथून सकाळी गाडी घेऊन बाहेर फिरण्यास पडल्यानंतर ते दिवे घाटमार्गे सासवडला गेले. यानंतर ते नारायण पूर आणि केतकावळे येथील बालाजी टेम्पल आणि परत दिवे घाटात आले. परत पुन्हा सासवड याठिकाणी गेले. तेथून सासवडकडून परत कात्रज घाट येथे आले. त्यानंतर जुना बोगदा आणि नवीन बोगदा मार्गे सातारा रस्त्यावर कार आली असल्याचे समोर आहे.