पुणे -नवीन इतिहास घडविणे जगजाहीर आहे, संभाजीनगरचा प्रस्ताव आधीच ठेवला असून त्याबाबत उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असे शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले आहे. दरम्यान आता पुण्याचे नाव जिजापूर करण्याबाबत मागणी होत आहे. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही लोक नामांतरामध्ये जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्वर्गीय मिनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी ममता दिन साजरा करत. गरिबांना ब्लँकेटचे वाटप केले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
संभाजीनगरचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यावर योग्यवेळी मुख्यमंत्री निर्णय घेतील, मात्र आता काहीजण पुण्याचे नामकरण जिजापूर करा अशी मागणी करत आहेत. मात्र मला वाटते हे लोक जाणीवपूर्णक तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत. असे असले तरी मी पुण्याच्या नामकरणावर प्रतिक्रिया देणार नाही, त्यावर सरकारच निर्णय घेईल असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या आहेत.
फडणवीस हे उत्तम प्रेक्षक आहेत
यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर देखील टिका केली आहे. फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार नाटक करत असल्याची टिका केली होती, त्याला निलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही नाटक कंपनी म्हणून काम करत असलो तरी, देवेंद्र फडणवीस प्रेक्षक म्हणून चांगले काम करतायेत, त्यांनी असंच काम करत राहावं, आमच्या भूमिकेवर शंका घेण्याची आवश्यकता नाही, मी परत येईन या वाक्याने त्यांना चांगलाच धक्का बसला असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.