पुणे- फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित 'मी सावरकर निबंध स्पर्धा' पारितोषिक वितरण कार्यक्रमात अभिनेते शरद पोंक्षे यांच्या भाषणाला काही विद्यार्थ्यांनी विरोध केला. तसेच कार्यक्रमावेळी जोरदार घोषणाबाजी केली. महाविद्यालयात एकाच विचारसरणीच्या कार्यक्रमांना वक्त्यांना परवानगी दिली जाते, मात्र इतर पुरोगामी वक्त्यांना परवानगी दिली जात नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
दरम्यान, शरद पोंक्षे कार्यक्रमस्थळी येताच विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नथुराम गोडसे मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच यावेळी माफीवीर मुर्दाबाद अशाही घोषणा देण्यात आल्या. विरोधात घोषणाबाजी सुरू असताना कार्यक्रमाच्या समर्थनातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे महाविद्यालयाच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या परस्पर विरोधी घोषणाबाजीच्या गदारोळात शरद पोंक्षे कार्यक्रम असलेल्या एमपी थेटर सभागृहात दाखल झाले.