पुणे - बारामती शहरातील समर्थनगरमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची झाल्याचे आढळल होते. त्यानंतर या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या बारा व्यक्तींची मंगळवारी तपासणी करण्यात आली. या तपासणीत कोरोनाबाधित व्यक्तीचा मुलगा आणि सुन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर आज (बुधवारी) त्या कोरोनाबाधित व्यक्तीची 1 वर्षाची आणि 8 वर्षांची नातवंडे (नाती) कोरोनाग्रस्त झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बारामती शहरात कोरोनाबाधितांची संख्या आता 6 वर पोहचली आहे.
हेही वाचा...बारामतीत आणखी दोन रुग्ण कोरोनाबाधित; कुटुंबातील व्यक्तींना लागण
बारामती शहर प्रशासनाने शहरातील समर्थनगर भागात आता लक्ष केंद्रीत केले असून, सदर कोरोनाबाधित लहान मुले इतर कोणाच्या संर्पकात आली होती का, याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका ज्येष्ठास कोरोनाची बाधा झाल्याने त्यास पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान सदर रुग्णाच्या थेट संपर्कात असणाऱ्या १२ नातेवाईकांना तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले होते. काल नऊ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यापैकी दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते.
आज (बुधवार) आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान या भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त केला असून या भागातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून अधिक कठोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली आहे.