देवाने मला अजून ५० वर्षे आयुष्य दिले तर त्यातील २५ वर्षे मी बाबासाहेबांना देईन – आशा भोसले - बाबासाहेब पुरंदरे
मी सगळ्या लेखकांची पुस्तके वाचली आहेत. यांनी माझे आयुष्य समृद्ध केले असून मला दुःख वाटलं तर मी पुस्तके वाचते. मला देवाने अजून पन्नास वर्षे आयुष्य दिले तर त्यातील पंचवीस वर्षे मी बाबासाहेबांना देईन, असे ज्येष्ठ गायिका आशा भोसले म्हणाल्या.
पुणे -बाबासाहेब पुरंदरे यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना गायिका आशाताई भोसले म्हणाल्या, “सर्वार्थाने महान असलेली आणि पाया पडण्यासारखी एकच व्यक्ती इथे आहे, ती म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. मी भाषण देणारी नाही, फार शिकलेली नाही, अनेक लेखकांच्या लेखनामुळे मला बोलता येते. पुस्तक वाचन केले. वाचनवेडी होते. लेखकांची आवड होती. कोल्हापुरात बाबासाहेबांची माझी भेट झाली. त्यांचा पुढे पाहुणचार करण्याची संधी मिळाली. गोनी दांडेकर, बाबासाहेब, दत्ता ढवळे यांच्यासारखी माणसे माझ्या घरी यायची, हे माझे नशीब होते. बाबासाहेबांनी अनेक गडकिल्ले सर केले त्याचे वर्णन त्यांनी मला ऐकवले. मनाची ताकद असल्याने त्यांनी हे शिवधनुष्य पेलले गेले.”
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतकमहोत्सवी वर्षाची सुरुवात मोठ्या थाटामाटात झाली. पुण्याच्या आंबेगाव परिसरातून शिवसृष्टीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पार्श्वगायिका पद्मविभूषण आशा भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, भारतीय जनता पक्षाचे आमदार व माजी मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यानंतर आशा भोसले बोलत होत्या.
आशा भोसले पुढे म्हणाल्या, “आम्ही दोघे आपापल्या व्यवसायात व्यग्र असलो तरीही स्नेह कायम राहिला. बाबासाहेबांनी दिलेली महादेवाची पिंडी आणि नंदी आजही माझ्या घरात आहे. आयुष्यात आलेल्या चांगल्या गोष्टी धरून ठेवते, वाईट सोडून देते. मोगऱ्याच्या फुलासारखे टवटवीत राहण्याची शिकवण दिली. बाबासाहेबांनी खूप दिले. मी खरे बोलणारी बाई आहे. सगळ्या लेखकांची पुस्तके वाचली. यांनी माझे आयुष्य समृद्ध केले. मला दुःख वाटलं तर मी पुस्तके वाचते. मला देवाने अजून पन्नास वर्षे आयुष्य दिले तर त्यातील पंचवीस वर्षे मी बाबासाहेबांना देईन. एक लाख एक रुपये आज आपल्या चरणावर ठेवते.