मुंबई - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker), हजारो लेकरांची माय (Mother of Orphans) सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं मंगळवारी (4 जानेवारी) निधन झालं. पुण्यातील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रपती कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय, सामाजिक, कला आदी क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
- राष्ट्रपतींनी सिंधुताईंना वाहिली श्रद्धांजली
सिंधुताई सपकाळ यांचे जीवन हे धैर्य, समर्पण आणि सेवेची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांनी अनाथ, आदिवासी आणि उपेक्षित लोकांवर प्रेम केले आणि त्यांची सेवा केली. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
- सिंधुताई समाजसेवेसाठी स्मरणात राहतील- पंतप्रधान मोदी
सिंधुताई सपकाळ या त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी कायम स्मरणात राहतील. त्यांच्या प्रयत्नामुळे अनाथ मुले चांगले जीवन जगू शकली. त्यांनी उपक्षेत समाजासाठी मोठे काम केले आहे. त्यांच्या निधनामुळे दु:ख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती, असे ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
- .. अनाथांची मातृदेवता हरपली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
सिंधुताईंनी निराधारांना आधार दिला. त्याचबरोबर शिक्षणाच्या माध्यमातून अनेकांना उभे केले. विशेषत: मुलींचे शिक्षण आणि त्यांनी स्वावलंबी व्हावे यासाठीचे त्यांचे योगदान महाराष्ट्र विसरू शकणार नाही अशी श्रद्धाजंली मुख्यमंत्र्यांनी वाहिली आहे.
- असंख्य लेकरे पोरकी झाली – राज्यपाल कोश्यारी
‘सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला – मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले. वात्सल्यमूर्ती सिंधुताई यांच्या निधनाने असंख्य लेकरे पोरकी झाली आहेत. या महान मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास आपल्या श्रीचरणांजवळ स्थान देवो व त्यांच्या सर्व लेकरांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो, ही प्रार्थना करतो’, अशा शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
- ही क्षती कधीही भरुन येणारी नाही - देवेंद्र फडणवीस
‘वात्सल्यसिंधू, अनाथांची माय अशा अनेक शब्दांनी देश ज्यांना ओळखत होता. भारत सरकारने नुकतंच ज्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. अशा खऱ्या अर्थानं मातृतुल्य सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानं एक खूप मोठी पोकळी तयार झाली आहे. त्या केवळ अनाथांच्या माय नाही तर अनेक महिलांसाठी त्या प्रेरणा होत्या. अगदी आयुष्य संपवण्यापासून ते अनाथांची माय बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. मला त्यांना अनेकदा भेटण्याची संधी मिळाली. मी मुख्यमंत्री असताना त्या आपल्या प्रकल्पाशी संबंधित अनेक विषय घेऊन यायच्या. त्यांच्या वागण्यातील जे वात्सल्य होतं, त्यामुळे प्रत्येकाला ती आपली आईच वाटायची. त्यामुळे आज खरोखर एक माता आपल्यातून निघून गेली आहे. समाजातील शेवटच्या माणसासाठी काम करणारं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं आहे. ही क्षती कधीही भरुन येणारी नाही. दुसऱ्या सिंधुताई होणे नाही. पण आता त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांचं कार्य आपल्याला पुढे घेऊन जावं लागणार आहे’, अशा भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
- सिंधुताईंचे अकाली निधन चटका लावणारे - शरद पवार
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभं केलेलं सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असं ट्वीट शरद पवार यांनी केलं आहे.
- महाराष्ट्राची मोठी हानी – अजित पवार
ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, सिंधुताई सपकाळ यांनी समाजातल्या हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ केला, त्यांना शिक्षण देऊन आपल्या पायावर उभे केले, त्यांना मायेची सावली दिली. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करत, त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. आयुष्यभर संघर्ष, कष्ट करत त्यांनी सामाजिक कामाचा वसा जपला. त्यांच्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताईंच्या निधनाने हजारो अनाथांचे मातृछत्र हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
- एक सेवाव्रती, समर्पित व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड - अशोक चव्हाण
ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या निधनामुळे एक सेवाव्रती, समर्पित व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे. खडतर परिस्थितीशी संघर्ष करत हजारो अनाथ बालकांना त्यांनी मायेचा आधार दिला. अनाथांची माय होऊन त्यांचे भवितव्य घडवण्यासाठी सिंधुताई प्रामाणिकपणे काम करत राहिल्या. जगभरात त्यांच्या या कार्याची दखल घेतली गेली. तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेला त्यांचा हा प्रवास आज थांबला असला तरी त्यांनी सुरू केलेला सेवायज्ञ कायम तेवत ठेवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- माई गेली, महाराष्ट्र पोरका झाला- यशोमती ठाकूर
महाराष्ट्राची माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले आहे. त्या 73 वर्षांच्या होत्या. माईंच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र पोरका झाल्याची भावना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, “निराधारांचा आधार आणि अनाथांची आई बनून समाजासाठी प्रेरणास्रोत ठरलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आकस्मिक निधन अतिशय दुःखदायक आहे. त्यांनी वात्सल्याची पाखर घालून मुख्य प्रवाहात आणलेल्या हजारो मुलांच्या आयुष्यातील प्रकाश बनून त्या नेहमी उजळत राहतील.”