महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच; मंडळांना ऑनलाईन परवाने

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक पुणे महानगरपालिकेत आयोजित करण्यात आली होती. त्यात गणेशोत्सवासंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळवताना कोणत्याही कार्यालयात फिरावे लागू नये, यासाठी मंडळांना ऑनलाईन परवाने दिले जाणार आहेत.

simply celebration Public Ganeshotsav in Pune
पुण्यात यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच

By

Published : Aug 13, 2021, 11:05 AM IST

पुणे - कोरोनाची दुसरी लाट शहरात ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सवही साधेपणाने करण्याचा निर्णय पुणे प्रशासनाने घेतला आहे. पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर घरच्या गणेशमूर्तींचे विसर्जन घरीच करावे, असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले आहे. त्यासाठी यंदा फिरत्या हौदांची संख्या दीडशेपर्यंत वाढवणार असल्याचीही माहिती महापौर मोहोळ यांनी दिली.

  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेत संयुक्त बैठक -

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक पुणे महानगरपालिकेत आयोजित करण्यात आली होती. त्यात गणेशोत्सवासंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीला उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रम कुमार, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, पोलीस उपायुक्त मितेश गट्टे, सागर पाटील यांच्यासह गणेश मंडळांचे पदाधिकारी, महापालिका अधिकारी उपस्थित होते.

  • मंडळांना ऑनलाईन परवाने दिले जाणार -

या बैठकीनंतर समाजभान जपत यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी राज्यात सर्वात आधी पुणे शहरानेच गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यंदाही मंडळांनी सामाजिक भान जपले आहे. गणेशोत्सव मंडळांना परवानगी मिळवताना कोणत्याही कार्यालयात फिरावे लागू नये, यासाठी मंडळांना ऑनलाईन परवाने दिले जाणार आहेत.

  • फिरत्या हौदांची संख्या वाढवणार -

गेल्या वर्षी फिरत्या हौदांची संख्या १०८ इतकी होती, ही संख्या यंदा १५० पर्यंत वाढवणार असून प्रत्येक क्षेत्रिय कार्यालय निहाय नियोजन केले जात आहे. अमोनियम कार्बोनेटची खरेदीही यंदा दुप्पटीने केली जाणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

  • घरच्या बाप्पाचे करा घरीच विसर्जन -

कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी तिसऱ्या लाटेचे संकट आहेच, या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी घरीच विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे. विसर्जनासाठी लागणारे अमोनियम कार्बोनेट आपण क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून पुरवणार आहोत. गेल्यावर्षी पुणेकरांनी गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन करण्यास प्राध्यान दिले होते. यंदाही बाप्पाचे विसर्जन घरीच करावे असे आवाहन महापौर मोहोळ यांनी केले.

हेही वाचा -Khela Hobe Day: ममतांची 'खेला होबे' ही घोषणा योगींच्या राज्यात निनादणार; युपीत टीएमसीकडून फुटबॉल सामन्याचे आयोजन

ABOUT THE AUTHOR

...view details