महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात यंदाही श्रीं'चे साधेपणाने स्वागत, पहा ईटीव्ही भारत'वर गणरायाचे सजलेले फोटो - Ganpati Mandals

यंदाही पुण्यातील मानाचे व प्रमुख गणपती मंडळांनी गणेशोउत्सव हा साध्यापद्धतीने आणि ऑनलाइनच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या वर्षीही असेच बाप्पाचे स्वागत करण्यात आले होते. यंदाही प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाप्पाचे आगमन साध्या पद्धतीने होणार आहे. त्याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी-

गणराया
गणराया

By

Published : Sep 10, 2021, 3:02 AM IST

पुणे - कोरोनाच्या पाश्वभूमीवर यंदाही पुण्यातील मानाचे व प्रमुख गणपती मंडळांनी गणेशोउत्सव हा साध्यापद्धतीने आणि ऑनलाइनच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या वर्षीही बाप्पाचे आगमन आणि उत्सव हा साध्यापद्धतीने साजरा करण्यात आला होता. यंदाही प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बाप्पाचे आगमन हे साध्या पद्धतीने होणार आहे.

पुण्यात मानाच्या गणपती मंडळांकडून यंदाही श्रीं'चे साधेपणाने स्वागत, ईटीव्ही भारत'चा खास आढावा

गणपतींचे दर्शन ऑनलाइन माध्यमातून घेता येणार

मानाच्या गणेश मंडळांसह सर्व सार्वजनिक मंडळांच्या वतीने यंदाही उत्सव साधेपणाने साजरा होणार आहे. मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना शुक्रवारी (१० सप्टेंबर) ला दुपार पर्यंत होणार आहे. प्रतिष्ठापनेआधी मिरवणुक निघणार नसली, तरी या गणपतींचे दर्शन ऑनलाइन माध्यमातून घेता येणार आहे. मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम यांच्या फेसबुक पेजवर, तर तुळशीबाग मंडळाच्या यूटय़ूब पेजवर प्रतिष्ठापनेचा सोहळा आणि 'श्रीं'च्या दर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

गणराया

मानाचा पहिला कसबा गणपती

मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांच्या मुहूर्तावर खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे 'श्रीं'ची मूर्ती पालखीतून उत्सव मांडवात आणण्यात येईल.

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 'श्रीं'च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सकाळी साडेअकरा वाजता वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या हस्ते सनई चौघडय़ांच्या सुरावटीत होणार आहे.

मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळ

गणराया

मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी एक वाजता केली जाणार आहे.

मानाचा चौथा तुळशीबाग मंडळ

मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 'श्रीं'च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. चिंतामणी जोशी पौरोहित्य करणार आहेत. गणपती मंदिरात प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिराभोवती आकर्षक घंटी महालाची सजावट सरपाले बंधूंनी साकारली आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून नागरिकांना त्याचा आनंद घेता येणार आहे. तसेच, गणेशोत्सवात युट्यूबवर शिल्पकारांचा गणपती या मालिकेतून तुळशीबाग मंडळात जडणघडण झालेल्या कलाकारांच्या मुलाखतीतून त्यांचे अनुभव व त्या काळी साकारलेले देखावे यांची माहिती मिळणार आहे. तसेच, गणेश याग, बृहनस्पती याग, मंत्रजागर, असे धार्मिक विधी गणेशोत्सवात होणार आहे

मानाचा पाचवा केसरी वाडा गणेशोत्सव

मानाचा पाचवा केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या 'श्रीं'ची मूर्ती परंपरेनुसार पालखीतून केसरीवाडय़ात आणली जाईल. 'केसरी'चे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता 'श्रीं'ची प्रतिष्ठापना होणार आहे. सनई-चौघडय़ाचा मंगलमयी स्वरनाद आणि धार्मिक विधी अशा थाटात श्री विराजमान होणार आहेत.

गणराया

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षानिमित्त गणेश चतुर्थीला शुक्रवार, दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजून २३ मिनिटांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. वेदमूर्ती नटराज शास्त्री व वेदमूर्ती मिलींद राहुरकर गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा मंदिरामध्ये संपन्न होईल. गणेशोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक आरास करण्यात येणार आहे.

ॠषीपंचमीनिमित्त आॅनलान अथर्वशीर्ष पठण

यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने ट्रस्टने ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ऋषीपंचमीनिमित्त शनिवार, दिनांक ११ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता अथर्वशीर्ष पठण सोहळा ऑनलाइन पद्धतीने होईल. ट्रस्टच्या फेसबुक पेज, इंस्टाग्राम याद्वारे या उपक्रमाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे.

गणराया

धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

दि. १० ते १९ सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी महागणेश याग आणि दुपारी १ ते सायंकाळी ६ पर्यंत लक्षावर्तन, होम-हवन हे वेदमूर्ती नटराज शास्त्री करणार आहेत. तर, ब्रह्मणस्पती सुक्त पारीजात वेदमूर्ती धनंजय घाटे व ब्रह्मवृंद करणार आहे. दिनांक १७ सप्टेंबर रोजी ६ वेदमूर्ती मधुकर जांभेकर गुरुजी मंत्रजागर करणार आहेत. उत्सवकाळात 'श्रीं' ची आरती ऑनलाइनच्या पद्धतीने भाविकांना अनुभविता येणार आहे. सकाळी ७.३० व रात्री ९ वाजता ही आरती भाविकांना सोशल मीडियाद्वारे घरबसल्या पाहता येईल.

गणराया

अखिल मंडई मंडळ

अखिल मंडई मंडळाचा १२८ वा गणेशोत्सव मागील वर्षाप्रमाणे यंदाही साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मंदिरातच शारदा गजानन विराजमान होणार आहेत. गणेश चतुर्थीला शुक्रवार, दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता 'श्रीं'ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि मीना भोंडवे यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होईल.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता होणार आहे.

गणराया

पुणेकरांनी देखील स्वत:ची आणि इतरांची काळजी घेऊन गर्दी टाळावी

यंदाही पुण्याच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पुणेकरांच्या हितासाठी आणि प्रशासनाच्या सहाय्यासाठी पुण्याच्या मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाच्या वतीने साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पुणेकरांनी देखील स्वत:ची आणि इतरांची काळजी घेऊन गर्दी टाळावी, असेही मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details