पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ( 1 मे ) औरंगाबाद मध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाष्य केले. मात्र, या सभेत बोलताना राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली, असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानावर आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले ( Lokmanya Tilak Built Shivaji Maharaj Samadhi ) आहे.
यावर आता ज्येष्ठ लेखक आणि वक्ते श्रीमंत कोकाटेंनी ( Shrimant Kokate ) आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बांधली नाही. उलट त्यांनी समाधीच्या नावाखाली त्याकाळी ८० ते ९० हजार रुपये गोळा केले. त्यात लोकमान्य टिळकांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप कोकाटेंनी केला आहे.
महात्मा फुलेंनी समाधी शोधली -श्रीमंत कोकोटे पुढे म्हणाले की, ३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाले. त्यानंतर काही दिवसांनी छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडावर त्यांची समाधी बांधली, असे सांगतच त्यांनी इतिहासाचा दाखला देखील दिला आहे. त्यानंतर रायगड किल्ला हा पेशवांच्या ताब्यात गेला आणि महाराजांच्या समाधीकडे प्रचंड दुर्लक्ष झाले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी 1869 ला महात्मा जोतिराव फुले यांनी शोधून काढली. तिचा जीर्णोद्धार केला, असे देखील कोकाटेंनी स्पष्ट केले.
इतिहासाची मोडतोड - खोट पण रेटून कसे बोलावे हे राज ठाकरे कडून शिकावे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका खोटारडा नेता झाला नसेल. इतिहासाची तोडामोड करून दिशाभूल करणारे विधान राज ठाकरेंनी केले, असा आरोपही कोकाटेंनी केला आहे.