पुणे : श्रावण महिना सुरू झाला ( Month of Shravan has Started ) आहे. हिंदू धर्मात या पवित्र महिन्याला विशेष असे स्थान आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, ( Hindu Calendar ) श्रावण ( Shravan ) हा आषाढ महिन्यानंतर येणारा पाचवा महिना आहे आणि तो भगवान शिवाला समर्पित आहे. या महिन्यात भक्त दर सोमवारी ( Shravani Somvar ) उपवास करतात आणि भगवान शंकराला बेलपत्र ( Belapatra ), गाईचे दूध, धतुरा, भांग आणि चंदन अर्पण करतात. या वर्षीचा पहिला श्रावणी सोमवार झाला आहे. पवित्र महिना २३ ऑगस्ट रोजी संपणार आहे. या महिन्यात अनेक जणांचे उपवास असतात.
श्रावण महिना :या महिन्याच्या पौर्णिमेच्या जवळ श्रवण नक्षत्र असल्याने श्रावण असे नाव या महिन्याला मिळाले आहे. वर्षा ऋतूचा हा पहिला महिना असून, या महिन्यात बहुतेक दर दिवशी वार व्रते, धर्मकृत्ये सांगितली आहेत. त्यामुळे या महिन्याला पवित्र श्रावणमास म्हणून महत्त्व दिले गेले आहे. पूर्वीच्या काळी या मासाला नभस् असेदेखील संबोधले जायचे. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखीपौर्णिमा, वरदलक्ष्मीव्रत, श्रीकृष्ण जयंती, पिठोरी अमावास्या हे या मासातील प्रमुख सण-उत्सव आहेत.
श्रावण मासातील वार आणि व्रते :रविवार - श्रावण मासातील प्रत्येक रविवारी मौन धारण करून गभस्ती नावाच्या सूर्याचे पूजन करावे. सोमवार - श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी शिवाचे पूजन, दिवसभर उपोषण व रात्री भोजन करावे. श्रावणातील सोमवारी नववधूने ५ वर्षे प्रत्येक सोमवारी, (शिवमुष्टी) ५ मुठी धान्य शिवावर वाहावे. प्रत्येक सोमवारी क्रमाने १) तांदूळ, २) तीळ, ३) मूग, ४) जवस आणि ५ वा सोमवार असल्यास सातू हे धान्य शिवमुष्टीसाठी घ्यावे. यादिवशी रुद्र अभिषेक, लघुरुद्र, रुद्रयाग इ. पूजा कराव्यात.