पुणे : पुण्यात एक धक्कादायक अपघाताची घटना घडली. पुण्यातील सासवड रोड सातववाडी येथे वडील दुचाकीवर मुलीला शाळेत सोडवण्यासाठी जात असताना कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्यावरून जात असताना पुढील दुचाकीस्वाराने रस्त्यावर कचरा फेकला असता, त्याची धूळ अंगावर उडू नये याकरिता गाडीचा वेग कमी करताच पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली. यात बाप-लेकीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर शाळकरी मुलीला उपचारासाठी घेऊन जाताना तिचाही मृत्यू झाला आहे.
अंगावर कचरा येऊ नये म्हणून गाडीचा वेग केला कमी : हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ग्लायडिंग सेंटरसमोर सातववाडी येथे झाला. नीलेश साळुंखे (वय ३५, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) मीनाक्षी साळुंखे (वय १०) अशी अपघातात मृत्यू झालेल्या बापलेकीची नावे आहेत. मीनाक्षी साळुंखे साधना विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती. आज सकाळी नीलेश जेव्हा आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी निघाले तेव्हा सातववाडी येथे नीलेश यांच्या पुढे असलेल्या दुचाकीस्वाराने रस्त्याच्या कडेला कचरा फेकला आणि तो कचरा आपल्या अंगावर येऊ नये म्हणून नीलेश यांनी गाडी स्लो केली. पण, मागून भरधाव येणाऱ्या कंटेनरने त्यांना धडक दिल्याने नीलेश साळुंखे यांचा अपघात झाल्याने त्यांचे आणि त्यांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे.