पुणे - इनाम इंडोमेंट ट्रस्टचे पदाधिकारी असल्याचे भासवून वक्फ बोर्डाची आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची तबल 7 कोटी 76 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खुसरो खान सरफराज खान (वय 49) यांनी तक्रार दिली असून, इम्तियाज महंमद हुसेन शेख व चांद रमजान मुलाणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक! पुण्यात वक्फ बोर्ड आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची 7 कोटींची फसवणूक
पुणे येथे इनाम इंडोमेंट ट्रस्टचे पदाधिकारी असल्याचे भासवून वक्फ बोर्डाची आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची तबल 7 कोटी 76 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अधिकारी यांची दिशाभूल केली
मुळशी तालुक्यातील माण गावात ताबून इनाम इंडोमेंट ट्रस्टची जमीन आहे. वरील आरोपींनी ट्रस्टचे पदाधिकारी नसतानाही अध्यक्ष आणि सचिव असल्याचे भासवले. दरम्यान, ट्रस्टची जमीन शासनाने अधिग्रहण केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मोबदला मिळावा म्हणून, कार्यवाही सुरू आहे. त्यावेळी या दोन आरोपींनी अध्यक्ष व सचिव असल्याचे भासवत खोटे अर्ज व वक्फ बोर्डाचे ना हरकत प्रमाणपत्र येथे सादर केले. तसेच, सरकारी अधिकारी यांची दिशाभूल करत त्यांच्याकडून या जमिनीचा 7 कोटी 76 लाख 98 हजार 250 रुपयांचा ड्राफ्ट घेऊन, तो ट्रस्टच्या खात्यावर जमा न करता स्वतःच्या खात्यावर जमा करून घेतला. अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.