पुणे -एक कथित ऑडियो क्लिप व्हायरल होत असून त्यामध्ये पुणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्याला फोनवरून शिवीगाळ करण्यात येत आहे. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात एक व्यक्ती मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क करतो. या ऑडिओ क्लिपमधील शिवीगाळ करणारे व्यक्ती हे कथितरित्या भाजप आमदार सुनील कांबळे असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून महिलेला दिलेल्या अर्वाच्य शिवीगाळीच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडीच्यावतीने आमदार सुनील कांबळे यांच्या कार्यालयाबाहेर भुंडा नारळाची ओहठी भरवून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी महिला कार्यकर्त्यांकडून सुनील कांबळे यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
नेमकं काय आहे प्रकरण -
या कथित ऑडियो क्लिपमधील महिला अधिकारी पुणे महापालिकेच्या ड्रेनेज विभागात कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्याकडील एका कामासंदर्भात एक व्यक्ती मोबाईलवरून त्यांच्याशी संपर्क करतो. यावेळी संबंधित महिला अधिकाऱ्याने काही वरीष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल असे सांगितले. त्यावर चिडलेले व्यक्ती या महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ही कथित ऑडियो क्लिप आहे. या ऑडिओ क्लिपमधील शिवीगाळ करणारे व्यक्ती हे कथितरित्या भाजप आमदार सुनील कांबळे असल्याचा आरोप केला जात आहे. या कथित मोबाईल रेकॉर्डिंगचे संभाषण आता व्हायरल झाले असून ते काही महिन्यांपूर्वीचे असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान त्यांनी ही ऑडिओ क्लिप आपली नसल्याचा दावा केला आहे. हे विरोधकांचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.