पुणे -बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. नुकत्याच केलेल्या एका वक्तव्यामुळे कंगना पुन्हा एकदा वादात सापडली असून कंगनावर सोशल मीडियावरून जोरदार टीका केली जात आहे. 1947साली देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती. खरे स्वातंत्र्य तर २०१४ सालामध्ये मिळाले. या कंगनाच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी समाचार घेतला आहे. कंगना रणौत प्रसिद्धीसाठी हपापली आहे. तिचा वरचा मजला रिकामा झालेला असून तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच तिचा पद्मश्रीही रद्द करावा, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली आहे.
हेही वाचा -कुठला बॉम्ब फोडायचा हे फडणवीस यांनी स्वतःच ठरवावे - नीलम गोऱ्हे
'प्रसिद्धीसाठी हपापली'
कंगनाचे वक्तव्य अत्यंत बेजाबदार असून स्वातंत्र्य योध्यांचा अपमान कारणारे आहे. या वक्तव्याचा निषेध करत कंगना नेहमीच बेताल वक्तव्ये करत असते, अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा -किरीट सोमैया हे बेरोजगार आहेत - नीलम गोऱ्हे
काय म्हणाली होती कंगना रणौत?
कंगनाने नुकतीच एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमास हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, की सावरकर, राणी लक्ष्मीबाई, सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्यासाठी रक्त सांडणार हे माहीत होते. मात्र भारतीयांकडूनच भारतीयांवर वार होणार नाही हे ध्यानात ठेवायला हवे. स्वातंत्र्यासाठी नक्कीच त्यांचे मोलाचे योगदान आहे. मात्र ते स्वातंत्र्य नव्हते, ती भीक होती. जे स्वातंत्र्य मिळाले ते २०१४ सालामध्ये मिळाले” अशी मुक्ताफळे तिने उधळली आहेत. दरम्यान, यावरून कंगना ट्रोल होत आहे.
वरूण गांधींनीही केली टीका
कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान, तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा आदर, तर आता शहीद मंगल पांडेंपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह, असा सवाल वरूण गांधी यांनी केला आहे.