पुणे- उत्तर कोल्हापूरच्या निवडणूक प्रचारावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) म्हणाले होते, भाजपचा उमेदवार निवडून आला नाही तर मी हिमालयात जाईन. त्यानंतर झालेल्या निवडणुकीचा निकाल ( Election Results ) आज लागला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला असून भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. यामुळे या विधानावरुन शिवसेनेने बॅनरबाजी करत चंद्रकांत पाटील यांनी डिवचले आहे.
दादा हिमालयात कधी जाताय..?- शिवसेनच्या वतीने पुण्यातील कोथरुडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालया समोरच 'चंद्रकांतदादा हिमालयात कधी जाताय..?', असा प्रश्न उपस्थित करणारा भलामोठा बॅनर लावण्यात आला ( Shivsena on Chandrakat Patil ) आहे. त्यावरुन आता भाजपचे नेते व कार्यकर्ते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी नेत्यांकडून तिकीट बूक -कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी आता हिमालयात जावे, यासाठी राष्ट्रवादीचे नेते राज राजापूरकर यांनी तिकीट बूक केले आहे. राष्ट्रवादीकडून हे तिकीट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी काढून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.