पुणे -एकनाथ शिंदे गटात सामील झालेले पुण्यातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्याबाबतची पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या बॅनरवरती दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचाच फोटो आहे. गेल्याच आठवड्यात शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. परंतु, मुख्यमंत्र्यांचा फोटो या बॅनरवरती लावण्यास आढळराव-पाटलांनी टाळलं ( Shivajirao Adhalarao Patil Wishesh Uddhav Thackeray On His Birthday ) आहे.
आढळराव-पाटील शिंदे गटात - एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सोशल मीडियावरुनच त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा त्यांनी त्या पोस्टमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो टाकणं टाळलं होतं. त्यानंतर या शुभेच्छांमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आढळराव यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मग काही तासांतच यू टर्न घेत, आढळराव पक्षातच असल्याचं जाहीर करण्यात आलं. मात्र, या कारवाईमुळे नाराज झालेले आढळराव काही दिवसांतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. ज्यांना नेतृत्व मानलं आहे, त्या एकनाथ शिंदे यांचे फोटो टाकणं यावेळी टाळलं आहे.