पुणे:शिवसेनेचे बंड नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेई पर्यंत अनेक राजकीय नाट्य पाहायला मिळाले. अनेक कायद्याचे गोष्ठी देखील मांडण्यात आल्या. आत्ता शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Expansion of Cabinet) लवकरच होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कायदेशीर की बेकायदेशीर यावर देखील चर्चा होत आहे. 'या सरकारला जेव्हा शक्य होईल, तेव्हा त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा'. 'पण मी म्हणजे कायदा असं जर कोणी आविर्भाव घेतला, तर तो फार काळ टिकत नाही. हा आत्ता पर्यंतचा अनुभव आहे'. असे मत शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Shiv sena Leader Neelam Gorhe) यांनी व्यक्त केलं. स्थानिक नगरसेवक राजू पवार यांनी आज शिवाजीनगर भागात शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या.
शिवसेना हा सर्व सामान्यांच्या विकासासाठी काम करीत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात अनेक चांगल्या उपक्रमाची अंमलबजावणी होत आहे. शिवसेनेच्या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाने गोरगरीब कुटुंबातील पालकांना वेगळ्या अर्थाने मदत होत आहे. शिवसेना करीत असलेल्या या कामामुळे सर्व सामान्य नागरिकांना अनेक चांगल्या संधी मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या विकासाला चालना मिळत आहे, असे देखील डॉ. नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.
सध्याचा राजकारणाचा प्रांत मोठा झाला आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने वाद केले जात असतात. मी एक भगवद्गगीतेवर विश्वास ठेवणारी आस्तिक आहे. त्यामुळे जे गेलेले आहेत, त्यांचा शोक करायचा नाही. आपल्यातून जे दुसरीकडे गैरसमजातून गेले असतील, त्यांचे गैरसमज दूर होतील आणि पुन्हा एकदा नदीचा प्रवाह सुरू होईल,असा मला विश्वास आहे.असे देखील यावेळी गोऱ्हे म्हणाल्या.