पुणे - शहरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. प्रत्येक सण - उत्सव हे दिमाखात आणि सर्व धर्मीय एकोप्याने साजरा केले जातात. पुणे शहरात मंगळवार पेठेतील वसाहतीमध्ये १२ बाय १२ च्या खोलीत मोहम्मद आणि मुमताज शेख हे दोघे पती-पत्नी राहतात. मागील २० वर्षांपासून मोठ्या श्रद्धेने ते गणेशोत्सव साजरा करत आहेत.
हेही वाचा -...म्हणून बूस्टर डोस घ्यावेच लागणार - डॉ. अविनाश भोंडवे
असे बसवण्यात आले गणराया
मोहमद शेख, मुमताज शेख आणि त्यांच्या दोन मुली शगुफ्ता आणि सुफीया, असे हे कुटुंब आहे. गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेबाबत मुमताज शेख म्हणाल्या, माझा भाऊ मंडळाचा अध्यक्ष असल्याने आमच्या परिसरात दरवर्षी गणपती बसवला जायचा. आम्ही तेव्हा दर्शनाला जात असे. त्याच दरम्यान मी खूप आजारी पडले. माझी वाचण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी घरातील व्यक्तींना सांगितले. तेव्हा माझ्या पतीने गणरायाकडे प्रार्थना केली की, मी यामधून बरी झाल्यावर माझ्या घरी तुझी प्राणप्रतिष्ठा करेल आणि देवाने देखील ते ऐकले. त्या आजारामधून मी ठणठणीत बरी झाली. त्यानंतर आमच्या घरी गणपती बसविण्यास सुरुवात झाली. तेव्हा अनेकांनी आम्हाला विरोध केला. मात्र, आम्ही कोणाचेही ऐकले नाही. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो आणि तेव्हापासून आजपर्यंत गणरायाची सेवा करत आहोत.