पुणे - गेल्या काही दिवसांपासून पवार आणि ब्राह्मण असा वाद सुरू असून ब्राह्मण समाज हा शरद पवार यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज ब्राह्मण समाजातील विविध संस्थाना बैठकीला बोलावले ( Sharad Pawar called Brahmin community organizations for meeting ) आहे. गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच ब्राह्मण समाजातील संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी अशाप्रकारे शरद पवार बैठक घेत आहेत.
बैठकीला ब्राह्मण महासंघातील पदाधिकारी हजर राहणार नाहीत - शनिवारी 21 एप्रिल रोजी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ब्राह्मण संस्थांना भेटायला बोलावले आहे. गेल्या 40 वर्षात पवार यांनी पहिल्यांदाच असे ब्राह्मण समाजाला चर्चेला बोलावले आहे. ज्यांच्या मध्यस्थीने निरोप आले आहेत त्यांचे म्हणणे असे आहे की, तुम्ही सर्वांनी येऊन तुमच्या नाराजीचे कारण सांगावे. पण आपले म्हणणे असे आहे की, साहेबांना पूर्ण कल्पना आहे की आपली नाराजी का आहे. त्यामुळे या बैठकीला ब्राह्मण महासंघातील पदाधिकारी हजर राहणार नाही, अशी भूमिका मात्र ब्राह्मण महासंघाने घेतली आहे, असे आनंद दवे यांनी सांगितले आहे.
'म्हणून आम्ही मिटिंगला जाणार नाही' -समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, गडकरी पुतळे, पुणेरी पगडी, संभाजी ब्रिगेड, श्रीमंत कोकाटे, बाबासाहेब पुरंदरे हे जुने विषय जरा बाजूला ठेवू, पण राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या विधान शब्द माघार घ्यायला सांगायचे होते. पण उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी शाहू महाराज आणि ज्योतिष यांची गोष्ट सांगितली. त्याच व्यासपीठावर पवार यांच्या उपस्थितीत भुजबळ यांनी पुरोहित हे धंदा करतात. ( व्यवसाय नाही ) हा शब्द वापरत पुन्हा टिंगल केली. आणि आरक्षणाच चुकीचे उदाहरणे दिले. तसेच पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर वेळोवेळी टीका केली. काही संस्था निश्चितच मीटिंगला जात आहेत. पण आम्ही जाणार नाही असे देखील आनंद दवे याने सांगितले.
'त्यांची भूमिका स्पष्ट करावी एवढीच अपेक्षा' - आमचा शरद पवार यांना व्यक्तिगत काहीच विरोध नाही, त्यांच्या मतदार संघातील ब्राह्मण समाज सुद्धा त्यांच्या वर नाराज असल्याचे फारसे ऐकीवात नाही. पण राजकीय फायदासाठी ते ब्राह्मण समाजाचा वापर करतात हे निश्चित... त्यांनी मिटकरी, भुजबळ यांची वक्तव्य यांच्या बाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी एवढीच अपेक्षा आहे. ज्या ज्या वेळेस पवार किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जातीय उल्लेख केले आहेत. त्या वेळेस अन्य राजकीय पक्ष सुद्धा मूग गिळून गप्प असतात हे सुद्धा तितकच दुर्दैवी असल्याचे देखील आनंद दवे यांनी सांगितले.
हेही वाचा - बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त मिरवणूक, ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांसह 25 जणांवर गुन्हा दाखल