पुणे- सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे ( SII ) कार्यकारी संचालक व कॉविशिल्ड लस निर्मितीत महत्त्वाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश जाधव यांचे बुधवारी (दि. 8 डिसेंबर) पुण्यात निधन झाले. डॉ. जाधव हे 72 वर्षांचे होते. सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोनावरील कोव्हिशील्ड वॅक्सीन ( Covishield Vaccine ) तयार करण्यात डॉ. जाधव यांचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
विविध प्रकारच्या लस निर्मितीत त्यांनी 40 वर्षे महत्त्वाचे योगदान
डॉ. सुरेश जाधव हे काही दिवसांपासून आजारी होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी संपूर्ण जगात आपल्या संशोधनाने वेगळा ठसा उमटवला. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण नागपूर विद्यापीठात झाले. विविध प्रकारच्या लस निर्मितीत त्यांनी 40 वर्षे महत्त्वाचे योगदान दिल्याने संपूर्ण जगातील वैद्यकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा होता.
कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशील्ड तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका
डॉ. सुरेश जाधव यांनी कोरोना लसीच्या संशोधनात मोलाचे योगदान दिले. तसेच सिरम इन्स्टिट्यूटची कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशील्ड तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. डॉ. जाधव हे बुलढाण्यासारख्या छोट्या गावातून पुण्यात आले. त्यांनी भारतातील लस संशोधनात योगदान दिले. तसेच जागतिकस्तरावर आपल्या कामातून स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. त्यामुळे त्यांना भारतीय लस संशोधनातील भिष्माचार्य म्हटले जाते. त्यांच्या नावावर जगभरातील अनेक पेटंट आहेत. डॉ. जाधव यांच्या जाण्यामुळे भारतीय वैद्यकिय क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना औषध निर्माण क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.
डॉ. सुरेश जाधव यांची कारकीर्द
डॉ. सुरेश जाधव यांनी नागपूर विद्यापीठातून फार्मसीमध्ये 'पीएच. डी. घेऊन 1970 पासून पन्नास वर्षांची अखंड सेवा दिली. त्यांचा कार्यकाळ मार्च, 2022 पर्यंत असला तरी प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी ऑक्टोबरमध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. सुरुवातीला नागपूर विद्यापीठ आणि 'एसएनडीटी विद्यापीठ येथे शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर हापकिनमध्ये संशोधक म्हणून त्यांनी लस उत्पादनासंबंधी काम सुरू केले होते. सन 1979 पासून सिरम इन्स्टिट्यूट येथे रुजू झाले.
हे ही वाचा -Omicron Pune : पुण्यातील ओमायक्रॉन रुग्णाच्या संपर्कातील सर्व 42 जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह