पुणे - राज्य सरकारने एक डिसेंबरला पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक जिल्ह्यात शाळा सुरू करण्याच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे, मात्र मुंबई महापालिकेने कोरोनाच्या नव्या प्रकाराचा धोका पाहता शाळा १ तारखेपासून सुरू होणार नसल्याचे जाहीर केले. पुणे शहरातही काल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मनपा हद्दीतील पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा ( Schools in Pune ) १५ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली.
हेही वाचा -मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषण - सशांक राव
मोहोळ म्हणाले, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटी धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. ऑस्ट्रिया, जर्मनी सारख्या शहरांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. पुणे शहरात लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले असले तरी, लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे, १५ डिसेंबरपर्यंत पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. पंधरा डिसेंबरनंतर पालक संघटना, प्राचार्य, शिक्षक आणि टास्क फोर्स यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल.
स्थानिक प्रशासन निर्णय घेत आहे
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिकॉन विषाणू आढळून आला आहे. विदेशात ओमिक्रॉन विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. परदेशात ओमिक्रॉनचा संसर्ग फोफावला आहे. राज्य सरकारने याची धास्ती घेत, उपाययोजना हाती घेतल्या आहेत. 1 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या शाळांबाबत तेथील स्थानिक प्रशासन निर्णय घेत आहे. दरम्यान काही ठिकाणी 1 डिसेंबर पासून शाळा सुरू होत आहेत, तर काही ठिकाणी 10 डिसेंबर ते 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनांनी घेतला आहे.