पुणे-तब्बल 9 महिन्यानंतर पूणे शहरात आजपासून इयत्ता 9 वी ते 12 वी च्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंग स्कुलमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पुण्यात शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र केवळ 66 च शाळा सुरू झाल्या आहेत. अनेक शाळेतील शिक्षकांच्या कोरोना चाचणीचे अहवाल आले नसल्याने अद्याप शाळा बंद आहेत.
9 महिन्यानंतर सुरू झाल्या शाळा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालय बंद करण्यात आले होते. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा सुरू होत्या. पुण्यात आज तब्बल 9 महिन्यानंतर आज शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यापूर्वी दोनदा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. अखेर आजपासून शाळा सुरू झाल्या आहेत.
आज फक्त 66 शाळा सुरू
तब्बल नऊ महिन्यानंतर शहरातील सर्वच शाळांमधील घंटा वाजेल अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेकडून शहरातील सर्व शाळांची तपासणी होऊ शकली नाही. तसेच अनेक शिक्षकांच्या कोरोना चाचणीचा अहवाल शिक्षण विभागाला सादर न झाल्याने, शहरातील अनेक शाळा अद्याप बंद आहेत. पहिल्या दिवशी महापालिकेच्या 44 आणि खासगी 22 अशा एकूण 66 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.