पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा सुरू असतानाच 'जिदाही दहशतवाद' या शब्दावरून पुणे विद्यापीठ गोत्यात आले आहे. हा शब्द वादग्रस्त असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने यावर तातडीने खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
'जिहादी दहशतवाद' शब्दावरून पुणे विद्यापीठ गोत्यात...अखेर दिलगिरी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा सुरू असतानाच 'जिदाही दहशतवाद' या शब्दावरून पुणे विद्यापीठ गोत्यात आले आहे. हा शब्द वादग्रस्त असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने यावर तातडीने खुलासा करत दिलगिरी व्यक्त केली आहे.
मागील तीन चार दिवसांपासून परीक्षा सुरळीत सुरू आहे. पण प्रश्नांची व पर्यायांची तज्ज्ञ समितीकडून व्यवस्थित छाननी न झाल्याने अनेक समस्या अद्यापही येत आहेत. त्यातच मंगळवारी समोर आलेल्या प्रकारामुळे विद्यापीठाचे धाबे दणाणले. विद्यापीठातर्फे "डिफेन्स बजेटींग' या विषयाची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये जिहादी दहशतवादाचे मुख्य कारण कोणते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात धार्मिक, क्रांतिकारी, राजकीय आणि राज्य पुरस्कृत असे चार पर्याय देण्यात आले होते. मात्र त्यानंतर हा प्रश्न सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाच्या कामावर टीकेची झोड उठली.
अखेर दिलगिरी
दरम्यान हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी स्तरावर झालेल्या एका परीक्षेत विचारलेल्या या प्रश्नामुळे सामाजिक व धार्मिक भावना दुखावल्या गेल्याबाबत तक्रारी विद्यापीठास प्राप्त झाल्या आहेत. यासंबंधी संबंधितांकडून खुलासा मागवण्यात आला असून विद्यापीठ योग्य ती कार्यवाही निश्चितपणे करेल,असे स्पष्ट करण्यात आले. तसेच या संपूर्ण प्रकाराबद्दल विद्यापीठ दिलगिरी व्यक्त करत असल्याचे सांगण्यात आले आहे. याच अनुषंगाने अशा प्रकारचे काही बनावट प्रश्न तयार करून समाज माध्यमांमध्ये व्हायरल करून विद्यापीठाची बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असल्याची बाब विद्यापीठाच्या निदर्शनास आली आहे. यासंदर्भात आवश्यक त्या कायदेशीर कारवाईला विद्यापीठाने सुरुवात केली आहे.