महाराष्ट्र

maharashtra

सारथीला पूर्णपणे स्वायत्तता देण्यात आली; छत्रपती संभाजीराजे यांची माहिती

By

Published : Jun 19, 2021, 10:48 PM IST

आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सारथीबाबत बैठक झाली. महत्वाची बाब म्हणजे, या बैठकीत सारथीला स्वायत्तता देण्यात आली आहे, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिली.

sarthi Autonomy Information Sambhaji Raje
सारथी हजार कोटी निधी

पुणे - मराठा आरक्षणाबरोबरच सारथीला स्वायतत्ता देण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सरकार दरबारी मागणी करण्यात येत होती. त्या संदर्भात वेळोवेळी आंदोलने देखील करण्यात आली होती. आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सारथीबाबत बैठक झाली. महत्वाची बाब म्हणजे, या बैठकीत सारथीला स्वायत्तता देण्यात आली आहे, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिली.

माहिती देताना खासदार संभाजी राजे

हेही वाचा -राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

बैठकीत खासदार छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संभाजीराजे यांनी माहिती दिली.

सारथीला स्वायत्तता देण्यात आली

कोल्हापूरच्या मूक आंदोलनानंतर सरकारने त्याची दखल घेतली आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्ही 7 ते 8 मागण्या केल्या आणि त्याबाबत सरकारने प्रयत्न देखील सुरू केले आहेत. या मागण्या मान्य करायला कमीत कमी 20 ते 21 दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, सारथीला स्वायत्तता मिळणे आणि आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सारथीबाबत बैठकही झाली. आजच्या बैठकीत आम्ही 13 ते 14 मागण्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर मांडल्या. त्यातील पहिली मागणी हे सारथीला हजार कोटी मिळण्याबाबत आणि त्याचा लाभार्थी विद्यार्थी कसा होऊ शकतो, हे देखील आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडले. आणि महत्वाचे म्हणजे, सारथीबाबत जी स्वायत्तता काढण्यात आली होती ती परत देण्यात आली आहे आणि 8 विभागीय कार्यालय देखील मंजूर करण्यात आले आहेत आणि पाहिले उपकेंद्र 26 जूनला कोल्हपूरला डिक्लेर होईल, असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

मला सारथीच्या पदाबाबत काहीच इंटरेस्ट नाही - संभाजीराजे

अनेक लोकांना वाटते की संभाजीराजे यांना सारथीमध्ये खूप इंटरेस्ट आहे. आणि त्यांना सारथीच्या पदावर जाऊन बसायचे आहे. पण, मला सारथीच्या पदाबाबत काहीच इंटरेस्ट नाही. मला खूप काम आहे, हे मी या आधीच जाहीर केले होते आणि आताही जाहीर करत आहे. जर समाजासाठी काम करणाऱ्या लोकांची निवड करायची आहे, तर ते तुम्ही करा आम्ही करणार नाही, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

मूक आंदोलन 21 तारखेला नाशिकला होणार

मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल मूक आंदोलन आम्ही मागे घेतलेल नाही. 21 तारखेला नाशिक येथे मूक आंदोलन होणार आहे. आणि तिथे राज्यातील सर्व समन्वयक येतील आणि तिथे पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

स्वयत्ताता देण्याची उपमुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी, तसेच उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली.

बैठकीचे दृश्य

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ व सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह पुणे येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी सारथी संस्थेचे अजित निंबाळकर, उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

पहिले उपकेंद्र कोल्हापूर येथे सुरू होणार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वायत्तता देण्यात येत आहे. सारथी संस्थेचे सबलीकरण व विविध उपक्रमांसाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. सारथी संस्थेचे आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. पहिले उपकेंद्र कोल्हापूर येथे पुढील महिन्यापासूनच सुरू करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या महत्वाच्या शहरात सारथीमार्फत मराठा समाजाच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या व्याज परतावा योजनेत प्राधान्य दिले जाईल. सारथी संस्थेने पुढील तीन वर्षाचा विभागनिहाय कृती आराखडा तयार करावा. यासाठी विभागनिहाय कार्यशाळा आयोजित कराव्यात.

तारादूत प्रकल्प सुरू करणार

सारथी संस्थेचे बंद असलेले उपक्रम व काही उपक्रम शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. त्यांना मान्यता घेवून उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. सारथी ही संस्था नियोजन विभागाच्या अंतर्गत असल्याने प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन भवनामध्ये सारथीच्या प्रतिनिधींसाठी जागा देण्यात येणार आहे. तारादूत प्रकल्पही सुरू करण्यात येणार आहे. शासनस्तरावर मराठा समाजाच्या तरुणांचे शैक्षणिक व नोकरीसंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. सारथी संस्थेने दिलेल्या स्वायत्तेचा लाभ घेवून आर्थिकदृष्ट्या गरीब मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. गरीब गरजू मराठा तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सारथी संस्थेने त्याप्रमाणे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासह सारथी संस्थेच्या स्वायत्तता व निधीसह विविध मागण्या केल्या होत्या. त्यातील बहुतांश मागण्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल खासदार संभाजीराजे यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा -पुणे माहापालिका हद्दीत अत्यावश्यक सेवा वगळता कडक विकेंड लॉकडाऊन

ABOUT THE AUTHOR

...view details