पुणे- पाच वर्षे सत्ता असतानाही स्वतःचा मतदारसंघ सांभाळू शकला नाहीत, आता राज्यभर दौरे काढून काय दिवे लावणार; अशी टीका भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडेंवर केली आहे. पाच वर्षे मंत्री आणि चाळीस वर्षे राजकारणात असताना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, असे ते म्हणाले. तसेच जी व्यक्ती 30 हजार मतांच्या फरकाने पराभूत होते, अशा व्यक्तींच्या वक्तव्याने पक्षाला कोणताही फरक पडत नसल्याचे काकडे यांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनी केलेल्या भाषणात भाजपच्या राज्य नेतृत्वावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना पंकजा मुंडे यांनी कोणालाच जवळ केले नसल्याचे ते म्हणाले. तसेच मराठा, मुस्लीम व ओबीसी समाज मुंडेंवर नाराज असल्यानेच त्यांचा पराभव झाला असून त्यांनी याचे खापर पक्षश्रेष्ठींवर फोडू नये, असे काकडे यांनी सुनावले. गोपीनाथ गडावरील मेळाव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.