पुणे -राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सध्या वाढत आहे. त्यामुळे विषाणूचा समूह संसर्ग टाळण्यासाठी राजगुरूनगर येथील खेड पोलीस स्टेशनच्या गेटवरच 'सॅनिटायझर टनेल' बसवण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस स्टेशनमध्ये येणारे नागरिक गेटवर बसवण्यात आलेल्या टनेलमधून येताना निर्जंतूक होऊन येत आहेत.
'कोरोना'चा समूह संसर्ग टाळण्यासाठी खेड पोलीस स्टेशनच्या गेटवर 'सॅनिटायझर टनेल' हेही वाचा...धक्कादायक!.. मातोश्रीजवळील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील पोलीसही क्वारंटाईन
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी पोलीस यंत्रणा सर्वाधिक काम करत आहेत. स्वतः च्या जिवाची पर्वा न करता जनतेसाठी अखंड सेवा देत आहेत. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी आणि बाहेरगावच्या नागरिकांवर करडी नजर ठेवण्यासाठी पोलीस सतत कार्यरत आहेत. खेड तालुक्यात कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण सापडला नाही. यात पोलिसांची भूमिका सर्वात महत्त्वाची राहिली आहे. त्यांच्याच सुरक्षिततेसाठी पोलीस आणि पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या नागरिकांना विषाणूचा संसर्ग होऊ नये, म्हणून हा टनेल बसवण्यात आला आहे. पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी खेड पोलीस स्टेशनच्या गेटवर हा सॅनिटायझर टनेल बसवला आहे.
पोलीस स्टेशनमध्ये बसवलेल्या या टनेलची सुरुवात पोलीस उपाधीक्षक गजानन टोम्पे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, रफिक मोमीन, आरोग्य विभागाचे अधिकारी गणेश देव्हरकर, महेश घुमटकर, बाळासाहेब सांडभोर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.