पुणे - मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या मागणीसाठी ते मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. मागणी मान्य न झाल्यास राज्य भर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशारा प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी पुण्यात दिला.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या अन्यथा राज्यभर आंदोलन करू, संभाजी ब्रिगेडची मागणी SEBC आरक्षण फसवे -
मराठा समाजाला SEBC प्रवर्गातुन आरक्षण देऊ नये हे आरक्षण कायद्याने टिकणार नाही हे संभाजी ब्रिगेड ने वारंवार स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने घटनात्मक पध्दतीने स्थापन केलेल्या मागासवर्ग आयोगाच्या समितीने मराठा समाजासाठी दिलेले आरक्षण घटनात्मक आहे. 'मराठा-कुणबी व कुणबी-मराठा एकच असून हा समाज सामाजिक, आर्थिक दृष्टया मागास आहे. त्यामुळे मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून त्यांना आरक्षण दिले पाहिजे. असे मागासवर्ग आयोगाने राज्य व केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे. मात्र, राजकिय इच्छाशक्ती नसल्याने मराठा समाजाला आरक्षणापासून उपेक्षित ठेवले जात आहे. त्यामुळे नोकरभरती थांबली आहे. प्रमोशन रखडले व विद्यार्थी महाविद्यालयीन व इतर प्रवेशापासून बंचित ठेवले गेले आहे. हा सत्ताधारी व विरोधीपक्षाचा गेम प्लान आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेड ने केला आहे. आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेले आरक्षण देखील मराठा समाजाला उपयोगाचे नाही, त्यामुळे फक्त ओबीसी मधून आरक्षण आवश्यक आहे. मात्र, असे आरक्षण देण्यास प्रस्थापित राजकीय नेत्यांची इच्छाशक्ती नाही हा संघर्षात्मक आंदोलन करणा-या व आरक्षणासाठी स्वतःचा प्राण देण्या-या प्रत्येक आंदोलकांचा ठरवून केलेला खुन आहे असे संभाजी ब्रिगेड चे म्हणणे आहे.
राज्य सरकार व विरोधी पक्ष करतायत मराठा समाजाची दिशाभुल -
राज्य सरकार व विरोधी पक्ष मराठा समाजाची दिशाभुल करत आहेत. त्यांना आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायचा नाही. म्हणुन वेळकाढूपणा करत आहेत. मात्र, यामध्ये मराठा समाजाची एक पिढी बरबाद होत आहे, हे सरकार व नेत्यांना दिसत नाही. भारतीय संविधान सर्वाना समान आहे घटनात्मक चौकटीत सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे. म्हणुन केद्र सरकारने मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी स्वीकाराव्यात किवा 'मराठा समाजाला सरसकट ओबीसी (OBC) कोटयातुन आरक्षण द्यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी केली. भारतात होणाऱ्या 2020-21 च्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये ORC ची सरसकट जातनिहाय जणगणना झाली पाहीजे, 'मराठा' समाजाला सरसकट ओबीसी (OBC) कोटयातुन आरक्षण मिळालेच पाहिजे. अन्यथा यापुढे शांत न बसता संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून संभाजी ब्रिगेड स्टाईलने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार आहे.