पुणे- शहरातील गणेशोत्सवात मानाच्या पहिल्या पाच गणपती मंडळाच्या तसेच प्रसिद्ध मंडळाच्या गणेशोत्सवाकडे सर्वांचे लक्ष असते. पारंपरिक वेशभूषेत पारंपरिक वाद्याच्या सोबत बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. यावर्षी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते भाऊ रंगारी मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापणा केली जाणार आहे.
हेही वाचा - गणेश प्रतिष्ठापनेसाठी पुण्यातील गणेश मंडळांची जय्यत तयारी
मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाच्या बाप्पाची मिरवणूक सोमवारी सकाळी 9.30 वाजता कुंटे चौकातून निघेल. हा उत्सव लिबराज चौक आप्पा बळवंत चौक मार्गे मंडपात जाईल. या मिरवणुकीत देवळणकर बंधूंचे नगारावादन, प्रभात बँड, श्रीराम आणि संघर्ष ढोलताशा पथक सहभागी होणार आहेत. श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी अकरा वाजून 40 मिनिटांनी सत्संग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यात्मिक गुरू श्री. एम यांच्या हस्ते होणार आहे. मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची मिरवणूक सकाळी 10.30 वाजता केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता गणपती चौक मार्गे उत्सव मंडपात दाखल होणार आहे. या मिरवणुकीत सतीश आढाव यांचे नगारावादन, न्यु गंधर्व बँड, शिवमुद्रा तालवाद्य, विष्णूनाद शंख ढोलताशा पथक सहभागी होणार आहेत. श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी एक वाजता एस. बालन ग्रुप चे पुनीत बालन आणि धारिवाल समूहाच्या जान्हवी धारिवाल यांच्या हस्ते होणार आहे. तसेच मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाची मिरवणूक सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल.
गणपती चौक, लिंबराज चौक, आप्पा बळवंत चौक, बेलबाग चौक आणि लक्ष्मी रस्त्याने उत्सव मंडपात मिरवणूक जाणार आहे. श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी साडेबारा वाजता केले जाणार आहे. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक सकाळी 10 वाजता निघणार असून दुपारी 12.30 वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा गणपतीची मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि 11.30 वाजता प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. या व्यतिरिक्त प्रसिद्ध गणपती मंडळ असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ बाप्पाची मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता निघणार असून 12.20 वाजता ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते होणार आहे. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या बाप्पाची मिरवणूक 8.30 वाजता मिरवणूक निघणार आहे. तर श्रींची प्रतिष्ठापणा सकाळी 11.30 वाजता केली जाणार असून शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे.