पुणे -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन टीका करताना त्यांची जीभ घसरली होती. यावर आता चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी राज्य महिला आयोगाला ( State Women Commission ) पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. यावर राज्य महिला आयोगाने पाटील यांना समज दिली आहे. आपल्या वक्तव्यामुळे महिलेच्या आत्मसन्मानाला धक्का लागू देऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी समज आयोगाने दिली आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Rupali Chakankar ) यांनी म्हटले आहे.
महिला आयोगाने मागितले होते स्पष्टीकरण :'घरी जाऊन स्वयंपाक करा. तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या', अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. या मुद्यावरून मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे त्यांच्या या वक्तव्यावरुन राज्य महिला आयोगाकडे तक्रार देखील करण्यात आली होती. यानंतर राज्य महिला आयोगाने चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. अखेर आज पाटील यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करणारे पत्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पाठवले आहे.