पुणे- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ( Maharashtra State Commission for Women ) यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा ( NCP ) राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि शरद पवार यांच्याकडे रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा पाठवला असून तो आज (गुरुवार) मंजूर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून रूपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष असतानाच रूपाली चाकणकर यांच्या गळ्यात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची माळ पडली होती. या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रुपाली चाकणकर लवकरच राजीनामा देतील अशा चर्चा रंगली होती. अखेर काल (बुधवार) सायंकाळी या चर्चेला पूर्णविराम भेटला आहे. रुपाली चाकणकर यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता पक्षात आहे.
रुपाली चाकणकर २०१९ पासून होत्या अध्यक्ष - २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तत्कालिन अध्यक्ष आणि चित्रा वाघ यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्या नंतर २७ जुलै २०१९ रोजी रूपाली चाकणकर यांची या पदावर वर्णी लागली होती. नंतर चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात अनेकदा शाब्दिक चकमक झालेले देखील पाहायला मिळाली. ज्या-ज्या वेळेस भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला लक्ष केले गेले तेव्हा रूपाली चाकणकर यांनी विरोधकांना सडेतोडपणे उत्तर दिलेले पाहायला मिळाले.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड - २०२१ मध्ये रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली. एक व्यक्ती एक पद या नियमामुळे रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. एका कार्यक्रमात त्यांनी या राजीनाम्याची घोषणा केली तेव्हा उपस्थित महिलांनी ताई राजीनामा देऊ नका असे म्हटले आणि महिलांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही मंचावर उपस्थित होते.