पुणे - पत्नीला विमानाचे परतीचे तिकीट अधिकृत करण्यास विमान कंपनीने नकार दिल्याने विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवल्याची घटना पुण्यात घडली आहे. अफवा पसरवल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी २८ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याला अटक केली आहे. या अफवेमुळे लोहगावच्या विमान तळावर खळबळ उडाली होती. सुरक्षा यंत्रणांनी बॉम्ब नसल्याची खातरजमा करुण पुन्हा सर्व सुरळीत सेवा सुरू झाल्या. मात्र या अफवेमुळे जवळपास रांचीला निघालेल्या विमानाच्या उड्डाणासाठी तीन तास झाला उशीर झाला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ऋषिकेश सावंत (वय 28, रा. बाणेर) असे अटक करण्यात आलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे.
हेही वाचा -नाशकात सोशल मीडियावर अफवा, चार लाखांच्या मदतीसाठी अर्जांचा ढिग;प्रशासनाची डोकेदुखी
आयटी कंपनीत कर्मचारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत हा आयटी कंपनी नोकरीला आहे. सावंत याच्या पत्नीला रांची येथे जायचे असल्याने शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता तो पत्नीला सोडण्यासाठी लोहगाव विमानतळावर आला होता. 16 ऑक्टोबरला त्याच्या पत्नीचे परतीचे तिकीट होते. परंतु 16 ऑक्टोबरपासून विमानतळ बंद आहे. त्यामुळे सावंत तेथील कर्मचाऱ्यांना विमानाचे परतीचे तिकीट 16 तारखेला अधिकृत करून द्या, असे सांगत होता. परंतू, कर्मचाऱ्यांनी तसे करण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने रांचीला निघालेल्या विमानात बॉम्ब आहे, असे ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे विमानतळावर खळबळ उडाली.
हेही वाचा -वर्ध्यात महालक्ष्मी प्रकटल्याची अफवा; कुटुंबीयांनी दिली अंनिसला लेखी माहिती
गुन्हा दाखल करून अटक
विमानतळावर बॉम्ब असल्याची माहिती मिळताच विमानतळ पोलीस सतर्क झाले. पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक, राज्य राखीव बलाच्या तुकड्या, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या तुकड्याही तातडीने त्याठिकाणी दाखल झाल्या. सावंतने सांगितलेले विमान तत्काळ बाजूला घेण्यात आले. विमानाची तीन तास कसून तपासणी करण्यात आली. त्यावेळी सावंतने विमानातील महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन केले. दरम्यान, ही अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विमानतळ पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.