पुणे - राज्यासह पुण्यात कोरोना पुन्हा वाढताना दिसत आहे. सध्या जी आकडेवारी वाढत आहे, तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. पुण्यात देखील मागील काही दिवसांपासून जी रुग्णसंख्या वाढत आहे ती आकडेवारी सुद्धा भेडसावणारी आहे. मागील चार दिवसांपासून पुण्यात रुग्णांची संख्या चार हजारांच्या पुढे जात आहे. त्याच अनुषंगाने शहरात कोरोनाचे निर्बंध कडक केलेले पाहायला मिळत आहेत. त्यातच मास्क वापरणे देखील सक्तीचे केले आहे. प्रशासन देखील मास्क वापरण्याबाबत जनजागृती करताना दिसत आहे. दरम्यान मास्क वापरण्यासाठी देखील अनेक नियम आहेत, मास्क कोणते वापरायचे, कुठल्या प्रकारचे मास्क परिधान करायचे, मास्कचा कालावधी किती असावा हे सगळे प्रश्न देखील आहेतच. बरेचजण साधे कापडी मास्क वापरताना दिसतात पण ते कितीपत योग्य आहे याविषयी शंका आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट..
एन-९५ मास्क आधिक सुरक्षित -
संसर्गाचा वेग जास्त असल्याने सद्यस्थितीत सर्जिकल किंवा कापडी मास्कच्या तुलनेत एन-९५ मास्क सुरक्षा प्रदान करू शकतो, असा निष्कर्ष पॅडेमिक रिस्पॉन्स टास्क फोर्स या संस्थेच्या अभ्यासातून समोर आला आहे. याबद्दल पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात कापडी ऐवजी एन-९५ मास्क वापरण्याचे आवाहन देखील केले होते.
15 मिनिटात होऊ शकतो संसर्ग -
नुकत्याच हाती आलेल्या एका अहवालानुसार मास्क न घातलेली व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास आणि कोरोनाबाधित रुग्णाने मास्क घातला नसेल तर १५ मिनिटात संसर्ग होऊ शकतो. जर मास्क असेल तर तो बचाव कसा होऊ शकतो आणि संसर्ग होण्याचे प्रमाण देखील खूप कमी आहे. त्यामुळे मास्क वापरणे आणि तेही सर्व नियम पाळून हे सध्या आपल्याला बंधनकारक आहे.