पुणे - एटीएम बसवण्याच्या बहाण्याने राज्यातील 75 ते 80 जणांना आमिष दाखवून तब्बल ८ कोटी रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. प्रत्येकी १० लाख रुपयांची फसवणूक झाली असून, याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
- 70 ते 80 जणांची करण्यात आली फसवणूक -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत 42 ते 43 लोकांनी तक्रार दाखल केली आहे. एकूण 70 ते 80 लोकांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2020 ते 4 सप्टेंबर 2021 या कालावधीत आदित्य शगून मॉल, बावधन येथे घडला आहे. या प्रकरणी मे. अन्नदाता मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर राजु भिमराव साळवे (वय 41) त्यांची पत्नी ज्योती राजु साळवे (वय 34 दोघेही राहणार आपटे कॉलनी, वारजे माळवाडी) व कंपनीचा मॅनेजर कुमार श्रीधर गोडसे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिक्रिया देताना गुंतवणूकदार हेही वाचा -मुंबई-नाशिक महार्गावरील हॉटेलसमोर ट्रक चालकाची चाकूने वार करुन हत्या
आरोपी राजू साळवे त्यांची पत्नी ज्योती साळवे आणि मॅनेजर कुमार गोडसे यांनी गुंतवणूकदारांकडून एटीएम बसवून देण्याचे सांगून, मोबदला म्हणून ज्यादा परताव्याचे आमिष दाखवले. आरोपींनी 75 ते 80 गुंतवणूकदारांकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची अनामत रक्कम घेतली. तसेच महिन्याला ६० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करुन अनामत रकमेचा अपहार केला. तसेच एटीएम न बसवता सर्वांची फसवणूक केली आहे.
- आम्हाला न्याय मिळावा, आरोपींना कठोर शासन व्हावं -
आम्ही गुंतवणूकदार विशाल विलास शहा (माढा, जि. सोलापूर) यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडलेत. एटीएम बसवण्याचा बहाणा दाखवून माझ्याकडून आरोपींनी १० लाख घेतले. त्यानंतर त्यांनी ६० दिवसात एटीएम मशिन बसवतो असे सांगितले. मात्र, त्यांनी ते बसवले नाही. त्यानंतर मला आरोपींनी २ महिने प्रत्येक ५४ हजार रुपये दिले. त्यानंतर मात्र त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. कोरोनाच्या संकटाचे कारण सांगून, त्यांनी पुढचे २ ते ३ महिने टोलवाटोलवी केल्याची माहिती विशाल शहा यांनी दिली. त्यानंतर आम्ही मे. अन्नदाता मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे आरोपी राजु भिमराव साळवे त्यांची पत्नी ज्योती राजु साळवे आणि कुमार गोडसे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हे सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तरी याप्रकरणी आम्हाला न्याय मिळावा, आमचे पैसे आम्हाला परत मिळावेत आणि आरोपींना कडक शासन व्हावे, असे गुंतवणुकदार विशाल शहा यांनी सांगितले.
- गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन -
या फसवणुकीप्रकरणी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या मध्यस्तीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले आहे. याप्रकरणी अजित पवार यांनी तातडीने चौकशीला गती देण्याचे आदेशही दिल्याची माहिती गुंतवणुकदार विशाल शहा यांनी दिली आहे.
हेही वाचा -धक्कादायक! पत्नीसह दोन वर्षाच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने हत्या करुन पतीची आत्महत्या