पुणे -आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भक्कम साथ आहे. रिपाइंसोबत असताना भाजपाने राज ठाकरे यांच्या नादाला लागून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करू नये. राज ठाकरे हे सातत्याने उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेत असल्याने भाजपाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भाजपाने मनसेसोबत जाणे योग्य होणार नाही, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजपाला दिला. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हेही वाचा -भारताने टी-20 मध्ये पाकिस्तानबरोबर सामना खेळू नये - रामदास आठवले
'निवडणूक एकत्र लढवणार'
भाजपा मनसेच्या नादाला लागल्यास रिपाइं भाजपाचा नाद सोडेल का, असे विचारल्यावर आम्ही त्यांचा नाद सोडला तरी ते आमचा नाद सोडणार नाहीत, असे आठवले म्हणाले. स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायची, की भाजपाच्या हे अजून ठरले नाही. मात्र आम्ही एकत्र निवडणूक लढवणार असून मागासवर्गीय आरक्षण पडल्यास पुण्यात महापौर आणि मुंबईचे उपमहापौरपद रिपाइंला मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या संदर्भात देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चादेखील करण्यात येणार आहे, असेही यावेळी आठवले म्हणाले.