महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Corona Third Wave : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अटळ

कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका नीती आयोगाने व्यक्त केला आहे. तिसरी लाट आली तर दररोज चार ते पाच लाख नागरिक कोरोनाने बाधित होतील असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

corona
संग्रहित फोटो

By

Published : Aug 23, 2021, 9:24 PM IST

Updated : Aug 23, 2021, 9:56 PM IST

पुणे -पुढील महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका नीती आयोगाने व्यक्त केला आहे. तिसरी लाट आली तर दररोज चार ते पाच लाख नागरिक कोरोनाने बाधित होतील असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे तिसरी लाट आलीच तर काय होईल? नागरिकांनी कशाप्रकारे काळजी घ्यावी? सरकारने काय उपाययोजना करणे गरजेचे आहे? याविषयीची अधिक माहिती देतायेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे.

हेही वाचा -नाशिककरांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती; मुहूर्त नसताना लग्नाचे उडवले जातायेत बार

  • तिसरी लाट येणार हे निश्चित -

कोरोनाची तिसरी लाट भारतात येणार हे निश्चित आहे. याचे कारण म्हणजे कोरोना महामारीसारख्या आजाराच्या लाटा एकामागोमाग एक येतच असतात. यापूर्वीच्या इतर महामारीमध्ये देखील हे दिसून आले आहे. युरोप आणि अमेरिकेत कोरोनाची चौथी लाट सुरू आहे. तर भारतात आतापर्यंत दोन लाटा आल्या आहेत, आणि तिसरी लाट येण्याची शक्यता निश्चित आहे. कोरोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेप्रमाणेच भयानक असेल. दुसऱ्या लाटेत भारतात 6 मे रोजी 3 लाख लोक एका दिवसात बाधित झाले होते. तर तिसऱ्या लाटेत एकाच दिवशी 4 ते 5 लाख लोक बाधित होतील असा नीती आयोगाचा अंदाज आहे.

माहिती देताना डॉ. अविनाश भोंडवे
  • लस घेतलेल्या 40 टक्के नागरिकांनाही धोका -

युरोपमध्ये लाट घेऊन गेल्यानंतर साधारणतः भारतात तीन महिन्यानंतर लाट येते. युरोपमध्ये मे आणि जून महिन्यात कोरोनाची लाट येऊन गेली. त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजेच सप्टेंबरच्या अखेरीस भारतात ही लाट येईल, अशी शक्यता आहे. जगामध्ये सर्वत्र लसीकरण होऊनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. इस्त्रायलमध्ये 75 टक्के पेक्षा जास्त, अमेरिका, इंग्लंडमध्ये 50 टक्केपेक्षा जास्त लसीकरण होऊनही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लस घेऊनही 40% नागरिकांना हा विषाणू बाधा करतो. त्याचबरोबर ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नाही अशा नागरिकांना या नवीन विषाणूची बाधा होण्याची संभावना जास्त आहे.

  • भारतात फक्त 9.5 टक्केच लसीकरण -

भारतात आतापर्यंत ज्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले अशा नागरिकांची संख्या साधारण साडे नऊ टक्के इतकी आहे. म्हणजे अजूनही 91 टक्के लोकांचं लसीकरण बाकी आहे. त्यामुळे लसीकरण न झालेले नागरिक तिसऱ्या लाटेचे बळी ठरू शकतात, असे नीती आयोगाने सांगितले आहे.

  • मोठ्या प्रमाणात आयसीयू, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची गरज -

जेव्हा कोरोनाची लाट येते तेव्हा 20 ते 22 टक्के लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यातील अडीच टक्के लोकांना आयसीयूची गरज भासते. त्यामुळे दिवसाला 5 लाख लोक बाधित होणार असतील तर सव्वा लाख व्हेंटिलेटरची गरज आपल्याला भासेल. पाच लाख ऑक्सिजन बेड तर दहा लाख विलगीकरणासाठी बेड लागतील. त्यातील पन्नास टक्के गोष्टींची पूर्तता येत्या काही दिवसात केली पाहिजे, असेही नीती आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

  • लशीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना कमी धोका -

तिसऱ्या लाटेत ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरीही 40 टक्के लोकांना बाधा होण्याची शक्यता आहे. परंतु अशा लोकांमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करत नाही, त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज भासत नाही, घरच्या घरी उपचार घेऊन ते बरे होऊ शकतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही खूप कमी होऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लस घेतली पाहिजे आणि कोविडच्या नियमांचे पालन केले पाहिजे.

  • प्रशासनाने हे करावे -

तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सरकारनेही लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढवला पाहिजे. आतापर्यंत आपण केवळ साडेनऊ टक्के लोकांचं लसीकरण करू शकलो ही फारशी योग्य गोष्ट नाही. त्यापेक्षा अधिक वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील ती ठिकाणे मायक्रो कंटेनमेंट म्हणून घोषित करावीत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवले पाहिजे. टेस्टिंगचे प्रमाणही वाढवले पाहिजे. ऑक्सिजन निर्मितीचे प्रमाणही तिपटीने वाढले पाहिजे. रेमडेसिवीर आणि इतर औषधांची निर्मिती आतापासूनच मोठ्या प्रमाणात करून ठेवली पाहिजे. तरच आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला व्यवस्थितपणे तोंड देऊ शकणार आहोत.

हेही वाचा -कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात नीती आयोगाने राज्याला कोणताही इशारा दिला नाही - राजेश टोपे

Last Updated : Aug 23, 2021, 9:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details