महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ

पुण्यात यावर्षी महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बलात्कार, छेडछाड आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

crime
संग्रहित फोटो

By

Published : Aug 1, 2021, 2:09 AM IST

पुणे - शहरात यावर्षी महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. बलात्कार, छेडछाड आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत यावर्षी आतापर्यंत 4157 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये बलात्काराचे 125, विनयभंगाचे 197 तर कौटुंबिक हिंसाचाराचे 160 गुन्हे दाखल आहेत.

मागील वर्षापेक्षा हे प्रमाण खूप मोठे आहे. मागील वर्षी याच कालावधीत बलात्काराचे 90, विनयभंगाचे 163 तर कौटुंबिक हिंसाचाराचे 133 गुन्हे दाखल होते. त्यामुळे आकडेवारीनुसार विचार केल्यास या वर्षी महिला अत्याचारावरील गुन्ह्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

दरम्यान महिला अत्याचारावरील घटनांमध्ये पुणे शहरात वाढ झाली असली तरी त्यापैकी बहुतांश गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून तत्काळ पूर्ण करून आरोपींना बेड्या ठोकण्यात येतात. त्याचबरोबर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पुणे पोलीस दलात दामिनी पथक, महिला हेल्पलाइन, महिला सहायता कक्ष, भरोसा सेल अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर पीडित महिला आणि तरुणींना सर्वतोपरी मदत केली जाते. महिला आणि तरुणीबाबत गैरप्रकार घडत असल्यास दामिनी पथक किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अवघ्या काही मिनिटात घटनेच्या ठिकाणी पोहचून पीडित महिलांची सोडवणूक करतात.

महिलांच्या सुरक्षेसाठी -

कोरोनामुळे शाळा महाविद्यालय सध्या बंद आहेत. परंतु यासारख्या ठिकाणी छेडछाडीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी दामिनी पथक, पोलीस काका तर नोकरदार महिलांच्या मदतीसाठी बडी कॉप सुविधा, छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी सतत बीट मार्शलची गस्त यासारख्या विविध उपाययोजना पुणे पोलिसांकडून शहरात सुरू आहेत.

महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी -

महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात या विषयी माहिती देताना गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे म्हणाले, महिला अत्याचाराच्या बहुतांश घटना या ओळखीच्या व्यक्तीकडूनच घडतात. आपली बदनामी होईल, नातेवाईक आपल्याला स्वीकारणार नाहीत अशा धास्तीने पीडित महिला अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडत नाही. अशावेळी पोलिसांच्या भरोसा सेलच्या माध्यमातून या महिलांना विश्वासात घेतले जाते, त्यांचे नाव बाहेर कुठेही लीक होणार नाही याचा विश्वास त्यांना दिला जातो आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाते. सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने फसवून लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना महिलांनी खबरदारी घेतली पाहिजे. अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करू नये. योग्य त्या वेळी योग्य ती खबरदारी घेतली तर महिला अत्याचाराच्या अनेक घटना टाळता येऊ शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details