पुणे -प्लास्टिक वापरणे किती धोक्याचे आहे, हे आपण अनेकवेळा पाहत असतो. बंदी असताना देखील प्लास्टिकचा वापर केला जात आहे. अशा वेळी प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर वाया जाते आणि वेस्टही होते. मात्र, या वेस्ट प्लास्टिकचा काय उपयोग करता येऊ शकतो, याचा विचार करून पुण्यात राहणाऱ्या एका महिलेने एक भन्नाट कल्पना तयार केली आहे. पुण्याच्या अमिता देशपांडे यांनी फेकून देण्यात येणाऱ्या प्लास्टिकवर प्रक्रिया करुन आकर्षक अशा टिकाऊ वस्तू बनवल्या ( Recycled Plastic Project In Pune ) आहेत. त्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी देखील चांगली आहे.
'रि चरखा'च्या माध्यमातून टाकाऊ पासून टिकाऊ
अमिता देशपांडे या वर्षापासून 'रि चरखा'नावाच्या सोशल इंटरप्रायजेसच्या माध्यमातून टाकाऊ प्लास्टिकपासून टिकाऊ वस्तू बनवत आहेत. कॉलेजच्या काळात अमिता गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करत असताना मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी कचरा पडलेला ते पाहत. त्या कचऱ्याचे काहीतरी केले पाहिजे, असा विचार त्यांना नेहमी येत असे. त्यानंतर त्यांनी रि चरखाच्या माध्यमातून प्लास्टिक विकत घेण्यास सुरुवात केली. नागरिक स्वत:हून त्यांना प्लास्टिक देऊ लागले. त्यापासून ते पर्स, बॅग्स, हँडबॅग, लपटॉप बॅग्स, मुलांसाठी पझल गेम आदी वेगवेगळे वस्तू बनवू लागले. याला जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.