दौंड - दौंड तालुका क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठीकीमध्ये तालुका क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यावेळी तहसीलदार तथा तालुका क्रीडा संकुल समितीचे कार्याध्यक्ष संजय पाटील, तालुका क्रीडा अधिकारी तथा तालुका क्रीडा संकुल समिती सचिव महेश चावले उपस्थित होते.
दौंड तालुका क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक १ कोटी ४३ लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता :
जागेअभावी गेले अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या दौंड तालुका क्रीडा संकुलाचा प्रश्न सोडवण्यासाठी कृषी विभागाच्या ८ एकर जागेच्या हस्तांतरास तत्कालीन मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली होती. जागेचा महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावल्यानंतर क्रीडासंकुलाच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यासाठी व दौंड तालुका क्रीडा संकुल संरक्षण भिंत उभारणीसाठी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजनमंत्री तथा पालकमंत्री, अजित पवार यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती. यानुसार क्रीडा संकुल संरक्षण भिंतीसाठी १ कोटी ४३ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. लवकरच कामाला सुरुवात व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी :
या बैठकीमध्ये तालुका क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. संकुलाच्या कामासाठी वास्तुविशारद नियुक्त करणे, बांधकामासाठी आवश्यक अंदाजपत्रके व आराखडा तयार करणे याबाबत चर्चा करण्यात आली. कामाचे नियोजन करताना खेळाडूंच्या भविष्यातील गरजा ओळखून कामाचे नियोजन करण्याच्या तसेच वेळोवेळी मिळणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आमदार राहुल कुल यांनी केल्या आहेत.